Current Affairs 27 February 2018
1) मराठी भाषा दिवस साजरा
मराठी मातृभाषेने आपल्याला बोलायला शिकविले, लिहायला शिकवले, आपले विचार व्यक्त करायला शिकवले त्या मातृप्रति आपला असलेला आदर, निष्ठा व्यक्त करण्याचा आजचा दिवस. मराठी भाषा ज्यांच्या लेखणीमुळे इतकी समृद्ध झाली ते म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो.
कुसुमाग्रंजाचा अल्प परिचय :
जन्म : २७ फेब्रुवारी १९१२, (आजपासून १०६ वर्षांपूर्वी) पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू : 10 मार्च १९९९ (वयाच्या ८७ व्या वर्षी), नाशिक, महाराष्ट्र.
राष्ट्रीयत्व : भारत
कार्यक्षेत्र : साहित्यकार, नाटककार, कादंबरीकार, पटकथालेखक, समीक्षक, कवी.
कुसुमाग्रजांनी आपले प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथून व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूल जे आता जे.एस. रुंगठा माध्यमिक शाळा म्हणून ओळखली जाते येथून पूर्ण केले. मुंबई विद्यापीठातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
करियर :
कुसुमाग्रज एच. पी. टी महाविद्यालयात असताना त्यांच्या कविता ‘रत्नाकर’ नावाच्या मासिकातून प्रकाशित व्हायच्या. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षी अस्पृशांच्या काळाराम मंदिरच्या प्रवेशाबाबतच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. १९३३ साली कुसुमाग्रजांनी ‘ध्रुव मंडळ’ स्थापन केले आणि ‘नवा मनु’ या वृत्तपत्रासाठी लेखन सुरु केले. याचा वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह *‘जीवन लहरी’* प्रकाशित झाला. १९३४ साली कुसुमाग्रजांनी इंग्रजी आणि मराठी या विषयांमधुन कला शाखेची पदवी संपादन केली. १९३६ साली कुसुमाग्रजांनी ‘सती सुलोचना’ या चित्रपटासाठी पटकथा लिहून या चित्रपटात एक भूमिकादेखील केली होती. ‘साप्ताहिक प्रभा’, दैनिक प्रभात’, ‘सारथी’, ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ यांसारख्या वृत्पात्रांसाठी, साप्ताहिकांसाठी कुसुमाग्रज लिहित होते. १९४२ हे वर्ष कुसुमाग्रज यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरले, कारण यावर्षी मराठी साहित्यातील जनक म्हणून ओळखले जाणारे वी. स. खांडेकर यांनी कुसुमाग्रज यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला व त्याबद्दल पुढील उद्गार काढले, “त्याचे शब्द सामाजिक असंतोष निर्माण करतात, पण जुन्या जगाला नवीन मार्ग दाखविण्याचा विश्वास निर्माण करतात”. १९४६ साली कुसुमाग्रज यांनी आपली पहिली कादंबरी ‘वैष्णव’ व पहिले नाटक ‘दूरचे दिवे’ लिहिले.
कुसुमाग्रजांचे लिखित साहित्य :
अ) कवितासंग्रह : १.विशाखा(१९४२) २.हिमरेषा(१९६४) ३.छंदोमयी(१९८२) ४.जीवनलहरी(१९३३) ५.जाईचा कुंज(१९३६) ६.समिधा(१९४७) ७.कणा(१९५२) ८.किनारा(१९५२) ९.मराठी माती(१९६०) १०.वादळवेल(१९६९) ११.रसयात्रा(१९६९) १२.मुक्तायन(१९८४) १३.श्रावण(१९८५) १४.प्रवासी पक्षी(१९८९) १५.पाथेय(१९८९) १६.मेघदूत(१९५६) १७.स्वागत(१९६२) १८.बालबोध मेव्यातील कुसुमाग्रज(१९८९) १९. काव्यवाहिनी २०.साहित्यसुवर्णा २१.फुलराणी २२.पिंपळपान २३.चंदनवेल
ब)कथासंग्रह : फुलवाली, छोटे आणि मोठे, सतारीचे बोल आणि इतर कथा, काही वृद्ध काही तरुण, प्रेम आणि मंजर, आहे आणि नाही, विरामचिन्हे, प्रतिसाद, एकाकी तारा, वाटेवरल्या सावल्या, शेक्सपिअरच्या शोधात, रूपरेषा, कुसुनाग्रंजाच्या बारा कथा, जादूची होडी.
क) नाटके : ययाती आणि देवयानी, वीज म्हणली धरतीला, नटसम्राट, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, वैजयंती, कौंतेय, राजमुकुट, आमचे नाव बाबुराव, विदुषक, एक होती वाघीण, आनंद, मुख्यमंत्री, चंद्र जिथे उगवत नाही, महंत, कैकेयी
ड)एकांकिका : दिवाणी दावा, देवाचे घर, प्रकाशी दारे, संघर्ष, बेट, नाटक बसत आहे आणि इतर एकांकिका
इ)कादंबऱ्या : वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर.
पुरस्कार आणि सन्मान :
१. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष (१९६०)
२. ‘मराठी माती’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६०)
३. ‘स्वागत’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६२)
४. ‘हिमरेषा’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६४)
५. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, गोवा अध्यक्ष (१९६५)
६. राम गणेश गडकरी पुरस्कार (१९६५)
७. ‘ययाती आणि देवयानी’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६६)
८. ‘वीज म्हणाली धरतीला’साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९६७)
९. मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूर चे अध्यक्ष (१९७०)
१०. ‘नटसम्राट’ साठी राज्य सरकारचा पुरस्कार (१९७१)
११. ‘नटसम्राट, साठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९७४)
१२. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’ (१९८५)
१३. पुणे विद्यापीठातर्फे D.Litt ही पदवी प्रदान (१९८६)
१४. ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७)
१५. संगीत नाट्य लेखन पुरस्कार (१९८८)
१६. जागतिक मराठी परिषद, मुंबईचे अध्यक्ष (१९८९)
१७. ‘पद्मभूषण’ पुरस्कार (१९९१)
१८. एका ताऱ्याला ’कुसुमाग्रज’ हे नाव दिले. (१९९६ )
2) अफगाणिस्तानचा राशिद खान क्रिकेट इतिहासातील सर्वांत युवा कर्णधार
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वांत युवा कर्णधार झाला आहे. राशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस आहे. राशिद खानने ३७ एकदिवसीय सामन्यातील ३५ डावांमध्ये ३.८२ च्या इकॉनामीने ८६ विकेट मिळवल्या आहेत. १८ धावांच्या बदल्यात ७ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. तर टी-२०च्या २९ सामन्यात त्याने ४७ विकेट टिपल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने एका डावात ३ धावा देऊन ५ विकेट घेण्याचा कारनामा केलेला आहे. राशिद आयपीएल १० मध्येही चमकला होता.
क्रिकेट इतिहासातील सर्वांत युवा कर्णधार:
राशिद खान (अफगानिस्तान) – १९ वर्षे १५९ दिवस
रोडनी ट्रॉट (बर्मुडा) – २० वर्षे ३३२ दिवस
राजिन सलेह (बांगलादेश) – २० वर्षे २९७ दिवस
तेतेंदा तैबू (झिम्बाब्वे) – २० वर्षे ३४२ दिवस
नवाब पतोडी (भारत) – २१ वर्षे ७७ दिवस
3) वांद्रे येथे उभारणार राज्यातील पहिले मराठीचे विद्यापीठ
वाचक चळवळ म्हणून ओळखल्या जाणा-या ग्रंथालीच्या पुढाकाराने मराठी भाषेचे राज्यातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे सुरू होणार आहे. मुंबई महापालिकेच्या जागेत आणि ग्रंथालीच्या पुढाकाराने हे विद्यापीठ उभे राहणार आहे. मराठी भाषेतील सर्व ग्रंथ व पुस्तकांनी सज्ज असे अद्ययावत ग्रंथालय यामध्ये असेल. तसेच मराठी भाषेच्या संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. परीक्षा, संशोधन,लेखन प्रोत्साहन असे मराठी भाषेचे उपक्रम या विद्यापीठामार्फत राबविण्यात येतील. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनेक वेळा करण्यात आली. परंतु, गेल्या साठ वर्षात त्याला मूर्त स्वरूप आले नव्हते.
अन्य भाषांची विद्यापीठे पण मराठीचे विद्यापीठच नाही
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आजवर तमीळ (२००४) संस्कृत (२००५ ), तेलुगू व कन्नड (२००८), मल्याळम (२०१३ ) आणि ओडिया (२०१४ ) या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला असून त्यांपैकी तमीळ (१९८१ ),तेलुगू (१९८५ ), कन्नड (१९९१ ), मल्याळम (२०१२ ) या भाषांची आपापल्या राज्यांत स्वतंत्र विद्यापीठे आहेत. संस्कृत भाषेचीही केंद्रीय,अभिमत आणि खासगी अशी अनेक विद्यापीठे देशाच्या वेगवेगळ्या भागांत कार्यरत आहेत. शिवाय ऊर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह परकीय भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठ (१९९८ ) हे हैद्राबादला आहे, तर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय (१९९७ ) महाराष्ट्रात वर्धा येथे आहे. मात्र मराठीचे विद्यापीठ नव्हते.
४) खंडेरायाच्या जेजुरीचा फोटो ठरला ‘जगातील सर्वोत्तम फोटो’
महाराष्ट्रामधील अनेकांचे आराध्य दैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरीची ख्याती पुन्हा एकदा जगभरात झाली आहे. यासाठी कारण ठरले आहे जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला टिपलेला फोटो. भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो ‘२०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो’ ठरला आहे. जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत असलेल्या विकीपिडीयाने आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये या फोटोने पहिला क्रमांक पटकावला आहे.
विकीपीडीयाने #WikiLovesMonuments ही थीम घेऊन जगभरातील व्यक्तींकडून त्यांच्या प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो मागवले होते. यामध्ये ४५ हून अधिक देशांमधील नागरिकांनी त्यांच्या देशातील सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांचे लाखो फोटो पाठवले. केवळ भारतातूनच सात हजारांहून अधिक फोटो या स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी प्रशांत खारोटे यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी जेजुरीच्या गडावर टिपलेल्या खंडोबाच्या यात्रेच्या या फोटोला पहिले पारितोषिक मिळाले आहे. प्रशांत खारोटे हे ‘लोकमत वृत्तपत्रसमूहा’च्या नाशिक आवृत्तीचे छायाचित्रकार आहेत. त्यांच्या या चित्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या गौरवाची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या माहिती केंद्रच्या ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे.
५) पाचवर्ष वयोगटाच्या आतील मुलांसाठी ‘बाल आधार’ कार्ड
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयने आता बाल आधार कार्ड लाँच केले आहे. पाचवर्ष वयोगटाच्या आतील मुलांना निळया रंगाचे हे आधार कार्ड जारी केले जाणार आहे. या बाल आधार कार्डासाठी बायोमेट्रीक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही. मूल पाचवर्षांचे झाल्यानंतर पालक जवळच्या आधार केंद्रात जाऊन बाल आधार कार्ड अपडेट करु शकतात. वयाच्या पाचव्या आणि पंधराव्यावर्षी बायोमेट्रीक पद्धतीने अपडेट करणे बंधनकारक आहे. एक ते पाचवर्ष वयोगटासाठी आधारकार्ड बंधनकारक नाहीय. परदेशातील शैक्षणिक कार्यक्रम आणि अन्य सरकारी स्कॉलरशिपसाठी बाल आधारकार्ड उपयुक्त ठरु शकते. बायोमेट्रीक पद्धतीने आधार कार्ड अपडेट करताना हातांच्या बोटांचे ठसे, डोळयांची बुबुळे आणि चेहऱ्याचा फोटो घेतला जाईल. वयाच्या 15 व्या वर्षीही अशाच पद्धतीनेच आधार अपडेट होईल.
MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.