⁠
Uncategorized

चालू घडामोडी – २७ जून २०१६

देश-विदेश

पंचमदांना ‘डुडल’च्या माध्यमातून ‘गुगल’चा मानाचा मुजरा
# आपल्या सदाबहार संगीताने अजरामर झालेले हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात पंचमदा यांना सोमवारी ‘गुगल’नेही मानाचा मुजरा केला असून, त्यांच्या जन्मदिनानिमित्त ‘गुगल’ने खास ‘डुडल’ तयार केले. पंचमदांचे चित्र या ‘डुडल’वर रेखाटण्यात आले असून, पार्श्वभागावर संगीताचे नोटेशन्स आणि विविध चित्रपटांतील चित्रे वापरण्यात आली आहेत. संगीतकार सचिन देव बर्मन अर्थात एसडी बर्मन यांचे एकमेव सुपुत्र असलेले पंचमदा यांनी आपल्या वेगवेगळ्या गाण्यांनी रसिकांवर अधिराज्य केले. हिंदीतील जवळपास ३३० चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. ज्यामध्ये शोले, यादों की बारात, मासूम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराच्या फिल्मफेअर पुरस्काराने तीनवेळा सन्मानित करण्यात आले होते.

भारत ‘एमटीसीआर’चा पूर्णवेळ सदस्य
# गेल्या आठवड्यात आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यात भारताला अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सोमवारी अधिकृतपणे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटाचा (मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिजिम) पूर्णवेळ सदस्य होणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या एनएसजी प्रवेशामध्ये खोडा घालणारा चीन सध्या एमटीसीआरचा सदस्य नाही. एमटीसीआरचे सध्या ३४ देश सदस्य आहेत. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले, फ्रान्स, नेदरलॅंड, लक्झेम्बर्ग या देशांच्या राजदूतांच्या साक्षीने भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर सदस्यत्वासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. एमटीसीआरचे सदस्यत्व मिळण्यासाठी भारताने गेल्यावर्षीच अर्ज केला होता. सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर आजपासून भारत या गटाचा पूर्णवेळ सदस्य बनेल.

क्रीडा

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून लिओनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा
# कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत चिलीकडून पराभवालासामोरे जावे लागल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फूटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. जगभरात कोटय़वधी चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहणाऱ्या मेस्सीने पाच वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान पटकावला आहे आणि कारकीर्दीत अनेक यशोशिखरे पादाक्रांत करून दिग्गज पेले आणि दिएगो मॅरेडोना यांच्या पंक्तीत स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मेस्सीच्या या अचानक निवृत्तीच्या घोषणेने फुटबॉल जगताला धक्का बसला आहे.

मोहम्मद अनास, अंकित, सरबानी यांची रिओवारी निश्चित
# धावपटू मोहम्मद अनास, लांब उडीपटू अंकित सिंग आणि २०० मीटर शर्यतपटू सरबानी नंदा यांनी रविवारी रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील पात्रता निश्चित केली. ओदिशाच्या २४ वर्षीय सरबानीने या वर्षांच्या सुरुवातीला दक्षिण आशियाई आणि फेडरेशन चषक स्पध्रेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. सोमवारी सरबानीने कझाकस्तान येथे सुरू असलेल्या जी. कोसानोव्ह स्मृती मैदानी स्पध्रेत २३.०७ सेकंदाची वेळ नोंदवून ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न साकार केले. ऑलिम्पिकसाठी २३.२० सेकंदाची पात्रता वेळ ठरविण्यात आली होती.

Related Articles

Back to top button