नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची ‘मुक्त ड्रोन नियमावली-2021’
केंद्रीय सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने मार्च 2021 महिन्यात प्रकाशित केलेली “मानवरहित विमान व्यवस्था (UAS) नियमावली-2021” रद्द करीत, त्याजागी नवीन ‘मुक्त ड्रोन नियमावली-2021’ तयार केली आहे.
– नियमावली विश्वास, स्वयं-प्रमाणपत्र आणि हस्तक्षेपविरहित देखरेख या मूलभूत तत्त्वावर आधारित आहे.
– सुरक्षा आणि सुरक्षिततेचा समतोल साधत, सुपर-नॉर्मल विकासाच्या या युगाशी सुसंगत अशी या नियमावलीची रचना आहे.
– रद्द केलेल्या मंजूरीप्रक्रिया: एकमेव प्राधिकरण क्रमांक, एकमेव फोटो ओळखपत्र, उत्पादनाचे प्रमाणपत्र आणि हवाई उड्डाण क्षमता, अनुरुपता प्रमाणपत्र, देखभाल प्रमाणपत्र, आत्यात ना-हरकत, सध्या अस्तित्वात असलेल्या ड्रोनला स्वीकृती, ऑपरेटर परवाना, संशोधन आणि विकास संस्थेची अधिस्वीकृती, विद्यार्थी रिमोट पायलट परवाना, रिमोट पायलट मार्गदर्शक लायसन्स, ड्रोन पोर्ट मान्यता इत्यादि.
– अर्जांची एकूण संख्या 25 वरुन 5 एवढी कमी करण्यात आली आहे.
– विविध प्रकारच्या 72 शुल्काच्या जागी आता केवळ चार शुल्क आकारले जातील.
– वापरकर्त्यास सुलभ जाईल असा एकल-खिडकी ‘डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म’ विकसित केला जाईल.
– डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर हवाई नकाशा ही नियमावली प्रकाशित केल्यानंतर 30 दिवसांच्या आत प्रसिद्ध केला जाईल. त्यात, हिरव्या पिवळ्या आणि लाल क्षेत्रांची चित्रमय माहिती असेल.
– ग्रीन झोन म्हणजे हरित क्षेत्रात, ड्रोन वापरण्यासाठी कुठलीही परवानगी लागणार नाही.
– आता ‘यलो झोन’ म्हणजेच पिवळे क्षेत्र, विमानतळ परिसराबाहेरील 12 किलोमीटरपर्यंत मर्यादित करण्यात आले. आधी हे 45 किलोमीटर इतके होते.
नीरज चोप्रा स्टेडियम : स्थळ पुणे संरक्षणमंत्र्यांनी केलं उद्घाटन
पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राचे नाव देण्यात आले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या समारंभाचे उद्घाटन केले. ‘नीरज चोप्रा स्टेडियम आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ असे नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे. यावेळी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकत १२१ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भारताला अॅथलेटिक्स प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळाले आहे. नीरजने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. तर दुसरीकडे भारताला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले आहे.
सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरज चोप्राच्या गुणसंख्येत वाढ झाली असून जागतिक क्रमवारीत त्याने झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीत नीरज चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
मँचेस्टर युनायटेडमध्ये रोनाल्डोचे पुनरागमन
ख्रिस्तियानो रानोल्डोचे मँचेस्टर युनायटेडमधील पुनरागमन शुक्रवारी निश्चित झाले आहे. रोनाल्डोने युव्हेंटस क्लबमधून स्थलांतरण प्रक्रिया पूर्ण केल्याच्या वृत्ताला संबंधित क्लबकडून दुजोरा देण्यात आला आहे.
पोर्तुगालचा आक्रमक रोनाल्डाने २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टरला आठ महत्त्वाची जेतेपदे जिंकून दिली होती. याबाबत कराराचा आकडा स्पष्ट होऊ शकलेल नसला, तरी ब्रिटन आणि इटलीच्या प्रसारमाध्यमांनी रोनाल्डोने दोन वर्षांसाठी दोन कोटी, ५० लाख युरोचा करार केल्याचे म्हटले आहे. २०१८मध्ये रोनाल्डोने रेयाल माद्रिदमधून युव्हेंटस क्लबमध्ये स्थलांतराचा करार केला होता.
लसीकरणाचा विक्रम : देशात एकाच दिवशी कोटींच्यावर लसीकरण
करोना महामारी सोबत लढण्यासाठी देशाला मोठे यश मिळाल्याचे समजत आहे. करोना लसीकरणामध्ये भारताने शुक्रवारी नवा विक्रम केला आहे. देशात शुक्रवारी एक कोटी पेक्षा जास्त लसीकरणाचा मोठा उच्चांक आकडा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे .
शुक्रवारी उत्तर प्रदेश या ठिकाणी 28.62 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. कर्नाटकमध्ये देखील 10 लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याचे समजत आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात सुद्धा 9 लाखाहून अधिक लसीकरण झाले. अजून पर्यंत कोणत्याही देशाला लसीकरणाचा इतका मोठा आकडा गाठता आला नाही. या वर्षअखेरीस डिसेंबर पर्यंत 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी भारताची वाटचाल सुरु आहे. भारताने एक कोटी पेक्षा अधिक डोस वितरित करण्याचा मोठा यशस्वी टप्पा पार केला आहे.
न्या. बी.व्ही. नागरत्न देशाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याची शक्यता
तीन महिलांसह नव्या नऊ न्यायमूर्तीची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. यापैकी बी.व्ही. नागरत्न या देशाच्या पहिला महिला सरन्यायाधीश होण्याची पुरेपूर शक्यता असून, सप्टेंबर २०२७ मध्ये त्या हे पद भूषवू शकतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली.
३४ न्यायमूर्तीची मंजूर क्षमता असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सध्या १० जागा रिक्त आहेत. लवकरच या नव्या न्यायमूर्तीनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केवळ एक जागा रिक्त राहील.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या आठवडय़ात आजवर प्रथमच ३ महिला न्यायमूर्तीची सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी शिफारस केली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या वरिष्ठ न्यायमूर्ती असलेल्या नागरत्न यांच्यासह तेलंगण उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली आणि गुजरात उच्च न्यायालयातील न्या. बेला त्रिवेदी यांचा या नावांत समावेश आहे.
यापैकी न्या. कोहली या १ सप्टेंबरला वयाची ६२ वर्षे पूर्ण करून निवृत्त होणार होत्या. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या बाबतीत ते ६५ वर्षे आहे.
याशिवाय, केरळ उच्च न्यायालयाचे न्या. सी.टी. रविकुमार आणि मद्रास उच्च न्यायालयाचे न्या. एम.एम. सुंदरेश यांचीही सर्वोच्च नयायालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्येष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी.एस. नरसिंहा हे वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयात पदोन्नत होणारे सहावे वकील ठरले आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायिक नियुक्त्या सप्टेंबर २०१९ पासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयातील १० रिक्त जागांपैकी पहिली न्या. रंजन गोगोई हे नोव्हेंबर २०१९ मध्ये सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यामुळे रिक्त झाली होती.