Current Affairs – 28 March 2017
देश-विदेश
# निवडणूक आयोगाकडून अंतर्गत निवडणुकीसाठी ६ महिन्यांची मुदत
निवडणूक आयोगाने काँग्रेसमधील अंतर्गत निवडणुकांची (संघटनेतील निवडणूक) मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला अंतर्गत निवडणुकांसाठी ३० जूनपर्यंतची मुदत दिली होती. मात्र आता या मुदतीत वाढ करण्यात येईल. त्यामुळे काँग्रेसला ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पक्षांतर्गत निवडणूक घ्यावी लागेल. काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकीत राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्त्वाची धुरा दिली जाऊ शकते. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या माध्यमातून अंतर्गत निवडणुकांसाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्याची मागणी करण्यात आली होती. अंतर्गत निवडणुकांचा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक असल्याचे काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने काँग्रेसला सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी दिला आहे. मात्र यासोबतच निवडणूक आयोगाने काँग्रेसला डिसेंबर २०१७ च्या आधीच अंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तंबी दिली आहे. डिसेंबर २०१७ ही अंतिम मुदत असेल, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला सांगितले आहे. ‘३१ डिसेंबरनंतर मुदत वाढवली जाणार नाही,’ असे निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेसला सांगितले आहे.
# रामगोविंद चौधरींकडे विरोधी पक्षनेतेपद
उत्तर प्रदेशमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या माजी कॅबिनेट मंत्री रामगोविंद चौधरी यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा दिली आहे. आझम खान आणि शिवपाल यादव यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी पक्षाचा नेत्याची निवड केली आहे. रामगोविंद यांना आमदारांच्या गटाचे नेते म्हणून अखिलेश यादव यांनी निवडल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी माध्यमांना दिली. समाजवादी पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्यामुळे रामगोविंद हेच विरोधी पक्षनेते बनतील.
# इंडियन एक्सप्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदी अव्वल
इंडियन एक्स्प्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. पंतप्रधान मोदी २०१५-१६ च्या यादीतही पहिल्या स्थानावर कब्जा केला होता. पंतप्रधान मोदींनी २०१६-१७ मध्येही अव्वल स्थान कायम राखले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा दुसऱ्या स्थानावर आहेत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत मागील वर्षी अमित शहा तिसऱ्या स्थानावर होते, तर सरसंघचालक मोहन भागवत दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र यंदा अमित शहा यांनी मोहन भागवत यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, त्यामुळे यंदा मोहन भागवतांची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मोदी आणि शहा जोडीने निवडणुकांमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी विरोधकांसोबतच स्वपक्षातील अनेकांनाही मागे टाकले आहे.
राज्य
# साहित्य अकादमी पुरस्कार परत करता येत नाही!
साहित्य अकादमी पुरस्कार बऱ्याच विचारविनिमयानंतर दिले जात असल्यामुळे या पुरस्काराचे मानकरी हा पुरस्कार परत करू शकत नाहीत, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केले. एकदा दिलेले साहित्य अकादमी पुरस्कार परत घेतले जाऊ शकत नाहीत, असा ठराव अकादमीच्या कार्यकारी मंडळाने २०१५ साली केला होता. त्यामुळे पुरस्कार परत करण्याच्या विरोधात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची काही गरज नाही, असेही मुख्य न्यायाधीश न्या. जी. रोहिणी व न्या. संगीता धिंगरा सेहगल यांच्या खंडपीठाने सांगितले. एम. एम. कलबुर्गी यांचा खून, तसेच दादरी येथील अखलाक हत्या प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर निर्माण झालेले ‘असहिष्णुता व जातीयवाद’ यांचे वातावरण याच्या विरोधात २०१५ साली अनेक लेखक, कवी व कलाकार यांनी त्यांना मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार परत केले होते.
# ‘अभिजात’ मराठी दृष्टिपथात
मराठी भाषेस अभिजात दर्जा देण्याच्या मागणीस विरोध करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या मार्गातील अखेरचा अडथळा दूर होऊन हा दर्जा दृष्टिपथात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे किमान येत्या १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिनापर्यंत या निर्णयाची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. मद्रास उच्च न्यायालयात याबाबत याचिका प्रलंबित असल्याने आम्ही मराठीच्या दर्जाचा प्रस्ताव संस्थगित ठेवला होता. पण न्यायालयाने अभिजात दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळल्याने आम्ही मराठीच्या प्रस्तावावरील धूळ झटकली आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. महेश शर्मा यांनी सोमवारी दिली. मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना लिहिलेल्या पत्रातही त्यांनी या माहितीला दुजोरा दिला.
# गायकवाड यांच्यावरील हवाईप्रवासबंदी तूर्त कायम
खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावर बंदी घालणाऱ्या विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेने लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. शिवसेनेचे गटनेते आनंदराव अडसूळ यांनी हा प्रस्ताव दाखल केला. दरम्यान, रवींद्र गायकवाड यांनी काढलेले मुंबई-दिल्ली विमानाचे तिकिट एअर इंडियाने पुन्हा एकदा रद्द केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.
# राज्यात मुद्रा योजनेची गती मंदावली
देशातील महत्त्वाकांक्षी पंतप्रधान मुद्रा योजनेची महाराष्ट्रात गती मंदावली आहे. या आíथक वर्षांत राज्यातील प्रकरणांची संख्या झपाटय़ाने घटली आहे. मुद्रा योजनेचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र सहाव्या स्थानावर आहे. देशात मात्र मुद्रा योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीची संख्या वाढली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १५ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यास तामिळनाडू अग्रेसर आहे. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अॅण्ड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड (मुद्रा)ची स्थापना भारत सरकारने केली असून ही संस्था लघु व सूक्ष्म, उद्योगांसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना वित्त उपलब्ध करून देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ एप्रिल २०१५ रोजी देशात महत्त्वाकांक्षी मुद्रा योजनेला प्रारंभ करण्यात आला. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशासह एकूण ३५ ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे. २०१६-१७ या आíथक वर्षांत १७ मार्च २०१७ पर्यंत देशात एकूण ३ कोटी ५९ लाख ७६ हजार ७५९ प्रकरणांसाठी १ लाख ५२ हजार ५९० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यापकी १ लाख ४७ हजार ५०८ कोटी रुपये वितरित करण्यात आले. २०१५-१६ च्या तुलनेत १५ हजार १५१ कोटी रुपये अधिक मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ३ कोटी ४८ लाख ८० हजार ९२४ प्रकरणांसाठी १ लाख ३७ हजार ४४९ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही तामिळनाडू योजनेचा लाभ घेण्यात प्रथम स्थानावर आहे. संपूर्ण देशात मुद्रा योजनेला प्रचंड लाभ मिळत असताना महाराष्ट्रात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. गेल्या वेळेस सर्वाधिक लाभ घेणाऱ्या राज्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्राची यावर्षी सहाव्या स्थानावर घसरण झाली.
क्रीडा
# टीम इंडियावर ‘बीसीसीआय’ खूश, प्रत्येकी ५० लाखांचे पारितोषिक
ऑस्ट्रेलियाला धूळ चारून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत(आयसीसी) अव्वल स्थान कायम ठेवणाऱया टीम इंडियावर बीसीसीआयने बक्षिसांचा वर्षाव केला आहे. कोहली ब्रिगेडमधील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने ५० लाखांचे रोख पारितोषिक जाहीर केले आहे, तर मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय, सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाला १५ लाखांचे इनाम देण्यात येणार आहे.
सोर्स – दैनिक लोकसत्ता