भारत-अमेरिकेच्या नौदलाचा युद्धसराव सुरू
भारत आणि अमेरिकी नौदलाचा दोन दिवसीय युद्ध सराव रविवारी पूर्व हिंद महासागरात सुरू झाला.
दोन्ही देशांतील सैन्य कराराचा तो भाग आहे. यात भारतीय युद्धनौका शिवालिक, समुद्री गस्त विमान पी-८ आय यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्डने पटकावला तिसरा आयटीएफ किताब
अमेरिकन टेनिसपटू अाॅलिव्हर क्रॉफर्ड हा रविवारी १५ हजार डॉलरच्या आयटीएफ डब्ल्यूटीटी कपचा मानकरी ठरला.
या चौथ्या मानांकित खेळाडूने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये आपल्याच देशाच्या झेन खानवर मात केली.
त्याने एक तास ८ मिनिटे रंगलेला सामना ६-३, ६-० ने जिंकला. यासह त्याने आपल्या टेनिस करिअरमध्ये तिसऱ्यांदा आयटीएफचा किताब जिंकला. यापूर्वी त्याने २०१८ अाणि २०२० मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले हाेते. किताब विजेत्या अाॅलिव्हरला ट्राॅफी अाणि १ लाख ५६,५०० रुपये देऊन गौरवण्यात अाले. तसेच त्याला किताबाने क्रमवारीत १८ एटीपी गुणांचा फायदा झाला.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : विजयवीर सिधू आणि तेजस्विनीळा सुवर्णपदक
विजयवीर सिधू आणि तेजस्विनी या युवा नेमबाजांनी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
सुवर्णपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात तेजस्विनी-विजयवीर यांनी भारताच्याच गुरप्रीत सिंग आणि अभिज्ञा अशोक पाटील यांच्यावर ९-१ अशा फरकाने मात केली.
डॉ. कर्णी नेमबाजी केंद्रात रंगलेल्या या लढतीच्या पात्रता फेरीत गुरप्रीत-अभिज्ञा जोडीने सर्वाधिक ३७० गुण मिळवले होते. तेजस्विनी-विजयवीर यांना ३६८ गुण मिळवता आले होते.
विजयवीर याने शुक्रवारी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर आता त्याने थेट सुवर्णपदकावर नाव कोरले.
यामुळे भारताने १३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यपदकांसह एकूण २७ पदकांसह आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले.
देशातील रस्त्यांवर चार कोटी जुनी वाहने, कर्नाटक अव्वल स्थानी
नवी दिल्ली – देशभरामध्ये १५ वर्षांपेक्षा जुनी झालेली चार कोटी वाहने धावत असून, या वाहनांवर हरित कर लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.
देशातील जुन्या वाहनांपैकी सर्वाधिक वाहने ही कर्नाटकमध्ये असून, उत्तर प्रदेश दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
केंद्रीय सडक आणि राजमार्ग मंत्रालयाने देशामध्ये धावत असलेल्या १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे.
त्यामध्ये सध्या देशातील रस्त्यांवर चार कोटी जुनी वाहने धावत असल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे यापैकी दोन कोटी वाहने ही २० वर्षे जुनी आहेत. या वाहनांमुळे प्रदूषणामध्ये वाढ होत असते. त्यामुळे राज्यांनी जुन्या वाहनांवर हरित कर लावावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि लक्षद्वीप या राज्यांमधील वाहनांचा समावेश नाही. या राज्यांची माहिती अद्याप संकलित झालेली नाही. ही माहिती हाती आल्यानंतर या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे