Current Affairs : 29 September 2020
संरक्षण सामग्री खरेदीतील ‘ऑफसेट’ धोरण रद्द
राफेलसारखी लढाऊ विमाने तसेच, अन्य संरक्षणविषयक सामग्री खरेदी करताना दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट (ऑफसेट धोरण) रद्द करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.
राफेल करारानुसार दासाँ कंपनीने तंत्रज्ञान हस्तांतरण करणे अपेक्षित असले तरी त्याबाबत कंपनीने कोणतीही अंतिम तारीख जाहीर केलेली नाही, असा ठपका ‘कॅग’ने ठेवला होता. याच करारांतर्गत एकूण करारमूल्याच्या ५० टक्के रक्कम भारतीय संरक्षण उत्पादक कंपन्यांमध्ये गुंतवण्याचेही बंधन आहे.
सन्य दलाला अधिक सुसज्ज बनवण्यासाठी अमेरिकेकडून ७२ हजार ‘असॉल्ट रायफल’ खरेदी केल्या जाणार आहेत.
२२९० कोटींच्या खरेदी प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी मंजुरी दिली. पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या संघर्षांनंतर लष्कराला अत्याधुनिक साधनसामग्री पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ७२ हजार ४०० एसआयजी रायफल खरेदी करण्यात आल्या.
कामगार कायदे डिसेंबरपर्यंत लागू होणार
सरकारने पूर्वी देशात लागू असलेल्या भाराभर कामगार कायद्यांची संख्या कमी करून तसेच अनेक कालबाह्य कायदे रद्द करून त्यांची संख्या चारवर आणली आहे. आता हे चार कायदे येत्या डिसेंबरपर्यंत देशभरात लागू करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे.
हे कायदे लागू होणार
१. वेतन विधेयक, २०१९
२. औद्योगिक संबंध विधेयक
३. सामाजिक सुरक्षा विधेयक
४. उपजिविका सुरक्षा, आरोग्य व कामकाजाची स्थिती विधेयक
अझारेंका, हॅलेपची विजयी सलामी – फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा
बेल्जियमचा डेव्हिड गॉफिन यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पराभव स्वीकारणारा पहिलाच मानांकनप्राप्त खेळाडू ठरला.
महिलांमध्ये अग्रमानांकित रोमानियाची सिमोना हॅलेप आणि 10वी मानांकित बेलारुसची व्हिक्टोरिया अझारेंका यांनी विजयी सलामी दिली.
रविवारी स्पर्धेला सुरुवात झाल्यावर 11व्या मानांकित गॉफिनला 19 वर्षीय इटलीच्या जॅनिक सिनेरकडून 5-7, 0-6, 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
याआधी सिनेरने गॉफिनवर फेब्रुवारीमध्ये रॉटरडॅम येथील स्पर्धेतही विजय मिळवला होता.
21वा मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नेरने फ्रान्सच्या एलियट बेन्शेट्रिटला 4-6, 6-1, 6-3 असे पराभूत केले.
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर
आठवडय़ाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत.
शेती क्षेत्रातील नव्या कायद्यामुळे शेतकऱ्याला शेतमाल देशभरात कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. आतापर्यंत शेतमाल कृषी बाजारात विकण्याचे शेतकऱ्यावर बंधन होते.