Current Affairs – 30 May 2017
# अशी असेल १ रूपयाची नवी नोट
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरच एक रूपये मुल्याची नवी नोट चलनात आणली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले. या पत्रकात म्हटल्याप्रमाणे भारत सरकारकडून एका रूपयाच्या नव्या नोटेची छपाई पूर्ण झाली आहे. नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या चलनात असलेल्या एक रूपयाच्या जुन्या नोटा वैधच राहणार आहेत. नवीन नोट पुढच्या आणि पाठच्या दोन्ही बाजुंनी गुलाबी आणि हिरव्या रंगाची असेल. या नोटेच्या दोन्ही बाजुंना केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांची स्वाक्षरी असेल. या नोटेवर ‘भारत सरकार’ या शब्दांबरोबरच एक रूपयाच्या नव्या नाण्याची प्रतिकृतीही असेल. तसेच भारतातील सर्व चलनी नोटांवरील ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य नोटेवर छापण्यात आले आहे.
# भारत-जर्मनी संबंधांत वेगाने सुधारणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) जर्मनीत झालेल्या भारत-जर्मनी शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. यावेळी त्यांच्यासोबत जर्मनीच्या चॅन्सेलर अॅंजेला मर्केल याही उपस्थित होत्या. जर्मनी येथे आयोजित कऱण्यात आलेली ही चौथी परिषद होती. मोदी नुकतेच युरोपच्या दौऱ्यावर गेले असून, आज त्यांनी बर्लिन येथील परिषदेला उपस्थिती लावली. जर्मनीच्या चान्सलर कार्यालयातर्फे मोदींचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी मर्केल आणि जर्मनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जर्मन सैन्याने भारताच्या राष्ट्रगीताचे अतिशय उत्तम सादरीकरण केले. उभय देशांमध्ये प्रत्येक दोन वर्षांनी होणाऱ्या या परिषदेत मोदी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांसोबत उपस्थित होते. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन, व्यापार मंत्री निर्मला सितारामन, ऊर्जामंत्री पियुष गोयल आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचा समावेश होता. याआधीची परिषद २०१५ मध्ये दिल्लीमध्ये पार पडली होती.
# दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील बंदीच्या निर्णयाला मद्रास हायकोर्टाची स्थगिती
आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मद्रास हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. चार आठवड्यांसाठी ही स्थगिती देण्यात आली असून केंद्र आणि राज्य सरकारने यावर चार आठवड्यात कोर्टासमोर भूमिका मांडावी असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. पशुबाजारात पशुंची विक्री केवळ नांगरणी व दुग्ध व्यवसाय यासारख्या शेतीशी संबंधित कामांसाठीच करता येईल, असा आदेश केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जारी केला होता. त्यानुसार म्हशी, गायी आणि उंट यांच्या विक्रीला बंदी घालण्यात आली होती. या निर्णयावरुन देशभरात टीकेची झोड उठली आहे. मद्रास हायकोर्टात या निर्णयाविरोधात एक जनहित याचिका दाखल झाली होती. एखाद्या व्यक्तीने काय खायला हवे हा त्याचा निर्णय आहे. दुसरी व्यक्ती त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. सेल्वागोमती आणि ए. इलाहीबाबा यांनी ही याचिका दाखल केली होती.