देश-विदेश
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी, उपमुख्यमंत्रीपदी नितीन पटेल
# आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे पुढील मुख्यमंत्री म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजय रुपानी यांची निवड शुक्रवारी करण्यात आली. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रीपदी कोणाला निवडायचे, यावर चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारपासून अहमदाबादमध्ये आहेत. या पदासाठी नितीन पटेल यांच्यासह केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचेही नाव चर्चेत होते. अखेर विजय रुपानी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
मच्छिंद्र कस्तुरे ‘बेस्ट शेफ’ पुरस्काराने सन्मानित
# अंजिर कोफ्ता, मूग डाळ पिझ्झा, पायनॅपल हलवा आणि सीताफळ हलवासारख्या राष्ट्रपती भवनातील अनेक स्वादिष्ट पदार्थांचे श्रेय मच्छिंद्र कस्तुरे यांना जाते. कस्तुरे हे राष्ट्रपती भवनात एक्झुक्युटिव्ह शेफ म्हणून कार्यरत होते. अलिकडेच त्यांना ‘नॅशनल टुरिझम अॅवॉर्ड्स’तर्फे भारतातील उत्कृष्ट शेफचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘नॅशनल टुरिझम अॅवॉर्ड्स’ अंतर्गत भारतातील पर्यटन आणि आदरातिथ्य विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना सन्मानित केले जाते. मच्छिंद्र कस्तुरे यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसह अनेक मान्यवरांसाठी स्वादिष्ट जेवण बनवले आहे.
महाराष्ट्र
‘नो हल्मेट नो पेट्रोल’ निर्णय अखेर मागे, रावतेंकडून विधानसभेत घोषणा
# दुचाकीस्वार आणि पेट्रोलपंप चालक यांना न रुचलेला आणि विरोधकांना न पटलेला ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ हा परिवहन विभागाने घेतलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘नो हेल्मेट नो पेट्रोल निर्णय मागे घेतल्याची घोषणा केली. हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल पंपावर इंधन दिले जाऊ नये, या परिवहन खात्याच्या निर्णयानंतर दुचाकी स्वारांसह विरोधकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. तसेच परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाचे पडसाद विधानसभेत उमटले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या निर्णयाच्या व्यवहार्यतेबद्दल शंका व्यक्त केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी परिवहन मंत्र्यांना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता. यावर पर्यायी उपाय म्हणून पेट्रोलपंपचालकांनी हेल्मेट शिवाय पंपावर येणाऱ्या गाड्यांचे नंबर संबधित आरटीओ कार्यालयात द्यावे, असे रावते यांनी निर्णय मागे घेताना सांगितले. पंपचालकाकडून मिळालेल्या माहितीच्या अाधारे हेल्मेट न वापरण्यावर कारवाई करण्यात येईल, असे रावतेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.
क्रीडा
नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी नियुक्ती
# रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. रिओ दी जानेइरो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत नीता यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य मिळविणाऱ्या नीता अंबानी या पहिल्या भारतीय महिला आहेत. जून महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी नीता यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी किमान ३९ मतांची आवश्यकता असते. ऑलिम्पिकस्पर्धेच्या पुर्वसंध्येला रिओ दी जानेइरो येथे पार पडलेल्या निवडणूकीत नीता अंबानी यांनी ७१ मते मिळवून सदस्यत्वाचा मान मिळविला.
टोकियो ऑलिंपिकमध्ये पाच नवे खेळ
# रिओ – रिओ ऑलिंपिक स्पर्धेचे बिगुल वाजत असतानाच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी) टोक्यो 2020 ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाच नव्या खेळांच्या समावेशास मान्यता दिली. “आयओसी‘च्या बुधवारी झालेल्या 129व्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. नव्याने समावेश करण्यात आलेल्या खेळांमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्ड, स्पोर्टस क्लायबिंग आणि सरफिंग यांचा समावेश आहे. यातील बेसबॉल/सॉफ्टबॉल आणि कराटे हे मैदानी खेळ वगळता अन्य तीन खेळ हे साहसी क्रीडा प्रकारांत मोडले जातात. या तीनही खेळांसाठी संयोजकांना तात्पुरती मैदाने उभी करावी लागणार आहेत. युवा पिढीला खेळाकडे आकर्षित करण्यासाठी या खेळांचा समावेश करण्यात आला आहे.