1) हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून बनवेल 1 दिवसात 10 हजार बॅरल इंधन; जगातील पहिला प्रकल्प
कॅनडाच्या कार्बन इंजिनिअर कंपनीने व्हँकोव्हर शहराजवळ एक प्रकल्प तयार केला आहे. तो हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून सिंथेटिक हायड्रोकार्बन इंधन तयार करेल. या इंधनामुळे प्रदूषण मुळीच होणार नाही. या पर्यावरणपूरक मोहिमेसाठी बिल गेट्स फाउंडेशननेही कंपनीला पैसे दिले आहेत. हा प्रकल्प एक वर्षात १० लाख टन कार्बन डायऑक्साइड शोषेल. तो सुमारे २.५ लाख वाहनांतून निघालेल्या कार्बन फुटप्रिंटएवढा असेल. एका प्रकल्पातून दिवसभरात १० हजार बॅरल हायड्रोकार्बन बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. वैज्ञानिकांच्या मते हवेतून एक टन कार्बन डायऑक्साइड शोषण्यास २५ हजार ते ६४ हजार रुपये खर्च येतो. पण कार्बन इंजिनिअरिंग फर्मच्या वैज्ञानिकांच्या मते या प्रकल्पात हा खर्च फक्त ६४०० रुपये प्रतिटन असेल. ही संकल्पना हार्वर्डचे भौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड केथ यांची आहे. हा प्रकल्प त्यांच्याच देखरेखीत सुरू आहे. केथ म्हणाले की, प्रदूषण संपवण्याची ही फक्त सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात जगाला प्रदूषणमुक्त करण्यास मदत करेल. प्रकल्प २००९ मध्ये सुरू झाला होता. तो तयार आहे. कंपनी इंधन विक्री २०१९ पासून सुरू करेल. प्रकल्पात ४० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. स्थानिक सरकारनेही ३० कोटी रुपये दिले आहेत.
2) अरुणाचलमध्ये 13,700 फूट उंचीवर बाेगदा तयार होणार
चार दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अरुणाचल प्रदेशातील सेला खिंडीच्या मार्गावर बोगदा तयार करण्याची घोषणा केली होती. बोगदा तयार करण्याचे काम सीमा रस्ते संस्थेने (बीआरआे) सुरूदेखील केले आहे. १३,७०० फूट उंचीवरील सेला भागात बोगदा तयार केल्यास अनेक फायदे होतील. पहिला फायदा अरुणाचल प्रदेशातील तवांगला होईल. बर्फवृष्टीमुळे तवांगचा नेहमीच उर्वरित भागापासून संपर्क तुटतो. परंतु हा बोगदा तयार झाल्यानंतर मात्र तवांग उर्वरित देशाशी जोडलेला राहील. दुसरा फायदा- बोगदा तयार झाल्यामुळे ४ हजार किमी लांबीची भारत-चीन सीमा सुरक्षेच्या दृष्टीने जास्त बळकट होऊ शकेल. तिसरा फायदा-तवांगपासून चीनचे अंतर १० किमीने कमी होईल. तेजपूरहून तवांग सैन्य मुख्यालयाचे अंतरही तासाभराने कमी होईल. लडाखला सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये संपर्कासह सुरक्षा प्रदान करण्याचे काम रोहतांग बोगदा करतो. जोजिला भागातही १४ किमीचा बोगदा तयार होईल. आता सेलातही बोगद्याचे काम सुरू करू, असे जेटलींनी सांगितले होते.
3) 2018 मध्ये भारताचे चांद्रयान -2
महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका महत्त्वाकांक्षी मोहितीमेची तयारी केली आहे. इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 2 योजनेच्या अखेरच्या टप्प्यात आहे. 2018 मध्ये हे चांद्रयान चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. चंद्राच्या दक्षिण गोलार्धावरील जागा या मिशनसाठी निवडण्यात आली आहे. तामिळनाडूतील महेंद्र गिरी येथील इस्रोच्या लिक्वीड प्रॉपल्शन सिस्टिम सेंटरवर सध्या या चांद्रमोहिम -2 च्या ‘टच डाऊन’ ची तयारी सुरू आहे. 70 ते 80 मीटर उंचीवरून चंद्रावर उतरताना किती वेग असावा याचा प्रोटोटाइपवर सराव करण्यात येत आहे. चांद्रयान -2 उतरवण्यासाठी दोन जागांचा विचार करण्यात आला. यापैकी एक जागा मोहिमेसाठी निवडण्यात येणार आहे. या भागात अन्य कोणतीही चांद्रमोहिम झालेली नाही, अशी माहिती इस्रोचे माजी प्रमुख ए. एस. किरण कुमार यांनी दिली. कुमार मागील महिन्यात इस्रोतून निवृत्त झाले.
4) मुंबई विमानतळाने मोडला स्वत:चा विक्रम; २४ तासांत ९८० विमानांची ये-जा
सर्वाधिक वर्दळ असलेला रनवे आहे मुंबई विमानतळाचा. तरीही २० जानेवारी रोजी २४ तासांत ९८० विमानांची ये-जा पूर्ण करून, या मुंबई विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी याच विमानतळावर २४ तासांमध्ये ९७४ विमानांची ये-जा झाली होती. लंडनमधील गॅटविक विमानतळाची दर तासाला ५५ एअर ट्रॅफिक कंट्रोल करण्याची क्षमता आहे, तर मुंबईचीे क्षमता ५२ आहे. मुंबई विमानतळावर खूपच कमी वेळा एक तासात ५२ विमानांचे नियंत्रण केले गेले आहे. गॅटविक सिंगल रनवेची उन्हाळ्याच्या दिवसात रोज विमानांच्या ये-जा करण्याची क्षमता ८७० आहे. गॅटविक विमानतळावर पहाटे ५ वाजेपासून ते अर्ध्या रात्रीपर्यंत १९ तास विमाने येत असतात. मात्र, मुंबई विमानतळावर २४ तास विमाने येत असतात. मुंबईत सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.५० ते ३ व रात्री ७.५०नंतर मोठ्या प्रमाणात विमाने येतात. सरासरी ४८ विमानांची ये-जा होते. मुंबईत जागेची कमतरता आहे. तर, लंडनमध्ये चार मोठी विमानतळे आहेत. हीथ्रो, गॅटविक एअरपोर्ट, स्टॅन्स्टेड एअरपोर्ट व ल्यूटन एअरपोर्ट इंग्लंडमध्येच आहेत. हीथ्रोमध्ये एकाच वेळी उपयोगात येणारे अनेक रनवे आहेत. मुंबईत फक्त एकच रनवे आहे.
5) १०० देशांमध्ये २४ तास ‘डीडी न्यूज’
विदेशांतील भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर भारताची भूमिका मांडण्यासाठी दूरदर्शनची २४ तास वृत्तसेवा १०० देशांत उपलब्ध करून देण्याचा विचार माहिती आणि प्रसारण मंत्रालय करीत आहे. सध्या दूरदर्शन इंडिया प्रामुख्याने विदेशांत वेगवेगळे सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, चीन आणि संयुक्त अरब अमिरात याच देशांत २४ तास वृत्त आणि चालू घडामोडींवरील कार्यक्रम सादर केले जातात. अनेक देशांत २४ तास वृत्तसेवा विस्तारण्याचा मंत्रालय विचार करीत आहे. विशिष्ट देशात वृत्तसेवा सुरू करण्याचा निर्णय खर्चिकही असेल. त्यात दूरदर्शनच्या वाहिनीचे प्रक्षेपण करण्यासाठी स्थानिक केबलची सेवा घेणे तसेच त्या देशांत बातमीदाराच्या वास्तव्याची सोय करणे हा खर्च मोठा आहे. वाहिनी सुरू करताना देशाच्या एकूण लोकसंख्येतील भारतीयांचे प्रमाण, तेथून भारतात होत असलेली थेट गुंतवणूक व भारतातून तिकडे जाणारा पैसा, त्या देशातून येणारे पर्यटक या बाबींचा विचार होईल.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.