अभ्यासाची साधने व मेहनत जितकी महत्त्वाची असते तितकेच महत्त्व असते मानसिक कणखरतेला. ‘यशाचा मटामार्ग’साठी यावर्षीच्या यूपीएससीतील यशस्वी उमेदवारांपैकी एक डॉ. नवनाथ गव्हाणे यांनी आपला प्रवास मांडला आहे खास तुमच्यासाठी… Mission MPSC
अधिकार आणि प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टीचे आकर्षण ठेवून तरुण पिढी सरकारी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. यात चूक असं काहीच नाही; पण तिथे पोचण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा त्याग आणि सहनशीलता ठेवावी लागते. मीही असाच एक सामान्य आणि ग्रामीण कुटुंबातून असून, ही परीक्षा देण्यासाठी धडपडत होतो. दहवीला गुणवत्ता यादीत आलो आणि लातूरला राजर्षी शाहू महाविद्यालयातून ९०% गुणांनी पास होऊन MBBS ला अॅडमिशन घेतली. आयुष्यातल्या या काळात यशाचा ग्राफ सतत चढता होता. पण, हळूहळू मी यूपीएससी परीक्षेकडे आकृष्ट झालो आणि ठरवले की हे कामही असच एका दमात करायचं. २०११ साली मुंबईच्या SIAC या संस्थेत दाखल झालो. पहिल्या प्रयत्नात दोन टप्पे पार करून मुलाखतीला पात्र झालो. पण मुलाखत चांगली देता आली नाही. परत आल्यावर खूप मित्र आणि जवळचे लोक यांनी मला यशाचा शुभेच्छा देणे चालू केले. मलाही बरं वाटायचं, पण माहीत होतं की निकाल सकारात्मक येण्याची शक्यता कमी आहे. निकाल लागला आणि मी फेल झालो. माझ्या व सर्वांच्याच आशा-अपेक्षांवर विरजण पडलं. सगळीकडे मी आय.ए.एस. होणार हे जाहीर असताना आता मात्र मी अचानक कुणीच नव्हतो.Mission MPSC
मी परत प्रयत्न चालू केले. या वेळी परत मुलाखतीला गेलो. मुलाखत झाली. माझ्या नातेवाइकांनी सांगितले की आम्ही आता गुलाल आणि सत्काराची तयारी केली आहे. घरच्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. पण याही वेळेस मी फेल! पुन्हा तेच. सगळीकडे शुकशुकाट. काहींनी आता मला यूपीएससीचा अभ्यास कसा करावा यासाठी टिप्स देणे चालू केले. गावाकडची कुजबुज वाढली. पोराचं वय वाढतंय, लग्न करा. आईवडील माझ्यापेक्षा जास्त लोकांना तोंड देत होते. काही लोक जवळ येऊन काहीच न बोलता जात होते. तुसडी नजर आणि तुच्छतेने भरलेले चेहरे वाढले.Mission MPSC
काही मित्र अजूनही माझावर विश्वास ठेऊन होते. मी तिसरा प्रयत्न दिला. लहान भाऊ म्हणाला की, यावेळी दिल्लीला विमानाने जा. मी त्यासाठी थोडे थोडे पैसे जमा केलेत. सगळ्यांपासून लपून ठेवलेले पैसे त्याने मला दाखवले. पण, यावेळी मुख्य परीक्षाच फेल झालो. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. प्रसंग अतिशय कठीण आणि मनाला छिन्नविछिन्न करणारा होता. आता आजूबाजूच्या लोकांनी अपेक्षा ठेवणेही कमी केलं. टीका करून अविश्वास दाखवणारे आणखी वाढले. मी चौथा प्रयत्न दिला. आता तर कडेलोट झाला. मी पहिलीच पूर्वपरीक्षा फेल झालो. माझी परिस्थिती खूप बिकट झाली. जेवढी मी पुढची आशा करत होतो तेवढा जोरात आपटत होतो. आता अपेक्षा ठेवायची भीती वाटायला लागली होती.Mission MPSC
पण, दुसरं मन मान्य करत नव्हतं. आता लढायचं किंवा लढत मरायचं. मी हट्टाला पेटलो आणि ठरवलं कि परत एकदा प्रयत्न द्यायचा. या वेळी मात्र मी काळजीपूर्वक चुका टाळण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी देशात २२०वा आलो. एका उमेदवाराच्या तयारीत सर्वात कठीण काम असतं ते आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षांचं ओझं कसं हाताळायचे ते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो पैशाचा. मध्यमवर्गीय, गरीब, निम्न मध्यमवर्गीय यांना हा मोठा यक्षप्रश्न असतो. मुलगा पदवीधर आहे आणि काहीही ना करता फक्त अभ्यास करतोय आणि यशही लवकर मिळत नाही. या गोष्टी समाज आणि बऱ्याचदा घरच्यानाही पटत नाहीत. जसे अपयश येत राहत तसं हा प्रश्न मोठं रूप धारण करत राहतो. काही वेळेस परीक्षेच्या ऐन वेळेस काही शारीरिक व्याधी समोर येते. अनेक महिन्यांची मेहनत पाण्यात जाते. या अशा समस्या मी आणि माझा सर्व यशस्वी मित्रांनी पाहिलेल्या आहेत. पण, कदाचित हाही यूपीएससीच्या ट्रेनिंगचा भाग असेल. अशा मानसिक, शारीरिक, भावनिक, आर्थिक आणि सामाजिक अग्निदिव्यातून गेल्यावरच खरी यशाची चव चाखायला मिळते. त्यामुळे खचून न जाता नाराज न होता जोमाने आणि आत्मविश्वासाने तयारी करणे, हा एकमेव पर्याय आहे.Mission MPSC
(डॉ. नवनाथ गव्हाणे यांचा हा लेख महाराष्ट्र टाइम्सच्या ‘यशाचा मटामार्ग’ या सदरात प्रसिद्ध झाला आहे.)