सार्वजनिक बांधकाम खात्याचे मिशन असलेल्या ‘हायब्रीड अॅन्युटी’ला गती देण्यासाठी ‘वेबीनार’चा राज्यातील पहिला प्रयोग मंगळवारी राबविला गेला. या ‘वेबीनार’मध्ये रस्ते-पूल बांधकाम क्षेत्रातील देश-विदेशातील २०० पेक्षा अधिक कंपन्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आॅनलाईन सहभाग घेतला.
राज्यात १० हजार किलोमीटरच्या रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. ३० हजार कोटी रुपये बजेट असलेल्या या बांधकामासाठी ‘हायब्रीड अॅन्युटी’ पॅटर्न आणला गेला. याअंतर्गत कंत्राटदार आपली गुंतवणूक करणार आणि नंतर शासन त्याला टप्प्याटप्प्याने परतावा देणार आहे. परंतु या योजनेला कंत्राटदार कंपन्यांचा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून ‘हायब्रीड अॅन्युटी’ नेमके काय आहे, हे देशभरातील बांधकाम कंपन्यांसमोर ठेवण्यासाठी ‘वेबीनार’ पार पडले. सेमीनारमध्ये कंपन्यांचे प्रतिनिधी एका स्थळी प्रत्यक्ष सहभागी होतात. परंतु ‘वेबीनार’मध्ये ते असतील त्या ठिकाणावरून आॅनलाईन सहभागी होवू शकतात.