भाजपच्या गुजरात शाखेने ३१ ऑक्टोबर रोजी एक जाहिरात मान्यतेसाठी आयोगाकडे पाठवली होती. या जाहिरातीत ‘पप्पू’ नावाचे पात्र दाखवण्यात आले आहे. काही कामानिमित्त हा पप्पू दुकानात जातो. दुकानात काम करणारा माणूस त्याला पाहून ‘सर, पप्पू आला आहे’ असे त्याच्या मालकाला सांगतो. हा ‘पप्पू’ मुका असून विकास म्हणजे काय हे त्याला कळत नसल्याचे यात दाखवण्यात आले आहे. अर्थात, पप्पूचा चेहरा जाहिरातीत दाखवण्यात आलेला नाही. असे असले तरी मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्यास आक्षेप घेतला आहे.
देशभरात हजारो लोकांना ‘पप्पू’ या नावाने संबोधले जाते. मात्र, राजकारणात हा शब्द भाजपकडून राहुल गांधी यांच्यासाठी वापरला जातो हे उघड आहे. निवडणूक आयोगाने नेमके त्यावरच बोट ठेवले आहे. ‘पप्पू’ हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीसाठी अपमानजनक आहे. हा शब्द उच्चारताच तो कोणासाठी उच्चारण्यात आला आहे, याचा बोध सर्वसामान्यांना सहज होतो, असे आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या या पवित्र्यामुळे भाजपची गोची झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त बी. बी. स्वेन यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.