हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. हिमाचल प्रदेशातील सर्व ६८ जागांसाठी मतदान होत असून सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये लढत आहे. हिमाचल प्रदेशात ६२ आमदारांसह एकूण ३३७ उमेदवार रिंगणात आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत असून १८ डिसेंबरला मतमोजणी होईल. हिमाचल प्रदेशात ४९.०५ लाख मतदार आहेत. त्यामध्ये २० हजार नवमतदारांचा समावेश आहे. राज्यात ७ हजार ५२१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होत आहे.
भाजप आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकांनी राज्यात ४५० हून अधिक रॅली केल्या आहेत. राज्यात भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या ७, तर पक्षाध्यक्ष अमित शहांच्या ६ सभा झाल्या आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी ३ जनसभांना संबोधित केले आहे.