भारताचे दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून फेरनिवड झाली आहे. न्यायाधीशपदाच्या शर्यतीत भंडारी आणि ब्रिटनचे उमेदवार ग्रीनवुड यांच्यात चुरस होती. मात्र, अखेरच्या क्षणी ग्रीनवुड यांना माघार घ्यावी लागली. भंडारींच्या फेरनिवडीने भारताने संयुक्त राष्ट्रसंघात मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे, असे मानले जाते. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी निवडणूक झाली. त्यात भंडारींना महासभेत १९३ पैकी १८३ मते मिळाली. सुरक्षा परिषदेतील सर्व १५ सदस्यांचेही मते मिळाली. तत्पूर्वी निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. निवडणुकीच्या आधीच ग्रीनवुड यांनी अनपेक्षित माघार घेतली. त्यामुळे भंडारींची फेरनिवड झाली. सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन हे ग्रीनवुड यांना पाठिंबा देतील, असे मानले जात होते. पण अखेरच्या क्षणी ब्रिटनचे स्थायी प्रतिनिधी मॅथ्यू राइटक्रॉफ्ट यांनी महासभा आणि सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांना पत्र पाठवून ग्रीनवुड यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे कळवले. निवडणुकीच्या अकरा फेऱ्यांमध्ये भंडारींना महासभेतील जवळपास दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, सुरक्षा परिषदेत ते ग्रीनवुड यांच्या तुलनेत तीन मतांनी पिछाडीवर होते.