सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत व्यवसाय आशावाद निर्देशांकात भारत घसरून ७व्या स्थानी गेला आहे. आदल्या तिमाहीत भारत दुस-या स्थानी होता. याचाच अर्थ तीन महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्था घसरली असल्याचे दिसते, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.
ग्रँट थॉर्न्टनने जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक अहवालात (आयबीआर) ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, व्यवसाय आशावाद निर्देशांकात इंडोनेशिया पहिल्या स्थानी आहे. फिनलँड दुसजया, नेदरलँड तिसजया, फिलिपिन्स चौथ्या, ऑस्ट्रेलिया पाचव्या आणि नायजेरिया सहाव्या स्थानी आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.
आगामी १२ महिन्यांतील महसुलाबाबत भारतीय व्यावसायिकांनी व्यक्त केलेला विश्वास फारच कमजोर राहिला, असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. भारतीय बाजारपेठांतील नफ्याबाबतचा आत्मविश्वासही डळमळीत झाला आहे. आदल्या तिमाहीत ६९ टक्के व्यावसायिकांनी नफ्याबाबत प्रबळ आशावाद व्यक्त केला होता.
या तिमाहीत केवळ ५४ टक्केच व्यावसायिक नफ्याबाबत आशावादी दिसले. विक्री किंमत आणि निर्यात यांच्यात वाढ होऊ शकते का, या मुद्द्यावरील विश्वासही घसरला आहे.
अहवालानुसार, भारतीय व्यावसायिकांत रोजगार वाढीबाबत मात्र चांगला विश्वास दिसून आला. आगामी १२ महिन्यांत रोजगारांत वाढ व्हायला हवी, असे मत ५४ टक्के उत्तरदात्यांनी व्यक्त केले. जूनच्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण ३ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय प्रकल्प, यंत्रसामग्री आणि संशोधन व विकास (आरअॅण्डडी) या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही भारतीय व्यावसायिकांत आशावाद दिसून आला.