मुलाखतीला जातांना…
बहुतांश नोकऱ्यांसाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत अनिवार्य असते. बऱ्याचदा उमेदवार लेखी परिक्षेत उत्तीर्ण होतात. काही नोकऱ्यांसाठी लेखी परीक्षा नसली तरी उमेदवाराची मुलाखत मात्र घेतली जाते. पण मुलाखतीत कमी पडल्याने चांगल्या नोकरीची संधी हुकते. यासाठी मुलाखतीसाठी विशेष तयारी करण्याची गरज असते. म्हणून उमेदवारांनी मुलाखतीला जाताना पुढील बाबी अवश्य लक्षात ठेवल्या पाहिजेत.
कपडे स्वच्छ, हलके रंगाचे असावेत, वेशभुषा सुंदर असावी : मुली किवा महिला पंजाबी ड्रेस, सलवार कमीज, साधी साडी किंवा पाश्चात्य संस्कृती मधील ऑफिसला साजेसा पोशाख परिधान करू शकतात. उदा. पँट शर्ट, स्कर्ट टॉप. पोशाख हा नेहमी त्या कंपनीला, आपल्या व्यक्तीमत्त्वाला शोभेल असा असावा. जास्त भडक, चकचकीत रंगाचे कपडे नसावेत. मुले किवा पुरुषांसाठी कोट, ब्लेझर किवा साधी पँट, शर्ट हे योग्य असेल.
स्वच्छ व नितळ भाषा, चेहरा व शारीरिक हालचालीत आत्मविश्वास असावा. पहिल्या काही मिनिटात मुलाखत घेणारे आपल्याला पारखतात. आपली वाणी जर साफ आणि स्वच्छ असेल तर आपले भाष्य समोरच्याला निट समजते आणि आपले मुद्दे व्यवस्थित मांडता येतात.
मुलाखतीचे स्थळ, तिथे जाण्याचे साधन, लागणारा वेळ हे जाणणे आवश्यक आहे. ही सर्व तयारी आदल्या दिवशी करून घ्यावी. हे केल्याने आपण त्या ठिकाणावर वेळेच्या आधी पोहचू शकतो. आपण बाथरूममध्ये जाऊन स्वत:ला सावरू शकतो म्हणजे प्रवासातला शीण घालवू शकतो आणि मुलाखतीसाठी सज्ज होऊ शकतो.
आपली सर्व कागदपत्रे क्रमाने लावलेली असावीत. आपला बायोडेटा प्रथम असावा. एक व्यवस्थित फाईल बघायला प्रत्येकाला नेहमीच आवडते. ह्यातून आपली शिस्त दिसून येते. आपल्या सादरी करण्याची एक झलक दिसून येते.
आपली मुलाखत कोण घेणार आहे, त्या व्यक्तीविषयी आणि त्यांच्या कार्यालयातल्या पदाविषयी जरूर जाणून घ्यावे व त्याप्रमाणे आपली तयारी करावी. ह्यामुळे आपल्याला संभाव्य प्रश्नांचा थोडासा अंदाज बांधण्यास मदत होते. आपले एक मन तयार होते व आपण उत्तरे आणखी सुरेख देऊ शकतो.
काही तयारी आपण नेहमीच केली पाहिजे. उदा. ही नोकरी आपल्याला का पाहिजे, ह्यामुळे आयुष्यात काय बदल होतील, ह्या पदाची काय मागणी आहे आणि काय तयारी केली पाहिजे ह्या प्रश्नांची उत्तरे, अभ्यास केल्याने सोपे जाते आणि आपण अडखळत नाही. हे एका चांगल्या उमेदवाराचे लक्षण आहे.
प्रश्न नीट समजून घेऊनच त्याचे उत्तर देणे योग्य. कारण यामुळे आपण किती चांगले श्रोते आहोत, हे कळते. शिवाय विषय समजून घेण्यास वेळ मिळतो. मुख्य म्हणजे आपली गफलत होत नाही आणि आपण बरोबर विषयाच्या दिशेने वाटचाल करत राहतो.
उत्तर नेहमी 2 ते 3 ओळीमध्ये द्यावे. विशिष्ट कौशल्य किंवा पात्रतेबद्दल विचारल्यास उत्तरात एखाद्या उदाहरणाचा उल्लेख जरूर करावा. असे केल्याने आपली विषयावरची पकड आणि अभ्यास दिसून येतो.
स्वत:ला एकदम शांत आणि तल्लख ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपल्याला सर्व काही नीट कळते आणि समजते. आपण काहीही गाळत नाही व मुलाखत सफल होते.
मुलाखत घेणाऱ्याला कंपनीबद्दल, आपल्या पदाबद्दल विचारा. ह्यामुळे आपला जर चुकीचा समज झाला असेल तर तो आपण दूर करू शकतो. आपल्या कामाविषयी अधिक जाणून घेऊन आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आपले विचार आणखी स्पष्ट होतात व निर्णय घेण्यास विलंब होत नाही.
पगार आणि इतर भत्त्यांबद्दल स्वत: विचारणे टाळा. असे विचारणे आपली फक्त व्यवहारी बुद्धी दर्शविते. हे व्यवसायात दिर्घकाळासाठी चांगले नाही.
पगार आणि त्या संदर्भात बोलताना आपले बाजारमूल्य जाणूनच बोलणी करावी. जर समोरचा पगाराविषयी स्वत:हून बोलत असेल तर मग आपण बोलावे. आपली पात्रता, शिक्षण आणि अनुभव ह्या जोरावर आपण आपले मानधन ठरवावे.
मुलाखत घेणाऱ्याकडून आपल्या संवाद कसा झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे यश मिळाले की नाही, हा अंदाज बांधण्यास मदत मिळते आणि आपण आपल्या त्रुटीवर काम करु शकतो.
आपला मोबाईल फोन बंद करून ठेवावा आणि सर्व लक्ष मुलाखत घेणाऱ्याकडे द्यावे. त्यामुळे आपले लक्ष फक्त मुलाखतीत राहते आणि आपण पूर्ण वेळ समोरच्याला देऊ शकतो.
सर्व लक्ष आपल्याला काय हवे आहे आणि आपण काय देऊ शकतो ह्यावर न ठेवता आपल्याला काय मिळू शकते ह्यावर असावे. ह्यामुळे आपला हेतू साध्य होतो व आपल्याला आणखी काय मिळू शकते हे नीट समजते.
आपल्या मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– सुजाता चंद्रकांत
(हा लेख ‘महान्युज’ या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून घेण्यात आला आहे.)
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC
तुमचे काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.