⁠  ⁠

दुखाच्या डोंगरावरही एमपीएससीची ‘ज्योत’ पेटविली

Tushar Bhambare
By Tushar Bhambare 3 Min Read
3 Min Read

ध्येयवेड्या तरुणीची नगरपरिषद मुख्याधिकारीपदी भरारी

 

पुणे – एमपीएससीची मुख्य परीक्षा तोंडावर आली असताना आजी निर्वतली. त्यावेळी अवघ्या तीन गुणांनी संधी हुकली. त्यानंतर आईला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंब खचून गेले. अवघ्या चार दिवसांवर मुख्य परीक्षा आली असताना आई सोडून गेली. त्या स्थितीतही परीक्षा दिली; मात्र हाती निराशाच आली. एकामागोमाग दु:खाचे डोंगर कोसळत असताना देखील खचून न जाता त्याच जिद्दीने अभ्यास करून त्या रणरागीणीने एमपीएससीचा गड अखेर सर करत आज नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून बहुमान मिळवला. त्या रणरागीणीचे नाव आहे ज्योती सुरेश भगत…

अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल : @MissionMPSC 

मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी आई-वडिलांनी तिन्ही भावंडांना शिक्षणासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी ठेवले. ज्योतीने वयाच्या पाचव्या वर्षी घर सोडले. दहावीनंतर तिने पुण्यात पाऊल ठेवले. लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न होते. त्यावेळी फुटबॉल स्पोर्ट अकादमीचे विनय मुडगोड यांनी तिचा शैक्षणिक आलेख आणि कल पाहता त्यांनी तिला प्रशासकीय सेवेत जाण्याचा सल्ला दिला. तो सल्ला मानून ज्योतीने प्रशासकीय सेवांचा अभ्यास सुरू केला.

एमपीएससीची मुख्य परीक्षा तोंडावर आली त्यावेळी आजीला रुग्णालयात दाखल केले होते. परीक्षा तीनच दिवसांवर असताना आजी निर्वतली. तीन गुणांनी तिची संधी हुकली. त्यानंतरच्या परीक्षेवेळी आईला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. यावेळी जिवाचा जीवलग होणाऱ्या “स्वप्नील’ने तिच्या स्वप्नांना उभारी दिली. “तुला लाल दिव्याच्या गाडीत पाहण्याची आईची इच्छा आहे, ती तू पूर्ण कर’ हा त्याचा शब्द प्रमाण मानून तिने अभ्यासाचा डोंगर पुन्हा उपसायला सुरवात केली. परंतु, मुख्य परीक्षेच्या काही दिवस आधी आई निर्वतली. अन्‌ हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा खाली पडला.

अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC 

मात्र, या घटनांनी खचून न जाता तिसऱ्या संधीला ज्योती एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. दरम्यान, तिच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच मुलाखत होती. हळद-देवकार्य या सगळ्यामध्ये मुलाखत उरकून घ्यायची होती. त्यावेळीही सासरच्यांनी आणि घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. एमपीएससीचा निकाल लागला परंतु यादीत ज्योतीचे नाव नव्हते. या परिस्थितीतही तिने जिद्द सोडली नाही. “कष्टाचे फळ देव देतोच’ या उक्ती प्रमाणे पुनर्निकालात ज्योतीचे नाव झळकले. तिची नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून निवड झाली. या यशात वडील सुरेश भगत, आई कै.भारती भगत, पती स्वप्नील पाटील, सासरे डॉ. संजीव पाटील, सासू डॉ. सुनीता पाटील, दीर दर्शन पाटील, बहीण सौ. दीपाली भगत-येवले, भाऊ जयदीप भगत यांची मोलाची साथ मिळाली, असे ती आवर्जून सांगते.

प्रशासनात काम करायला खूप वाव आहे. स्वत:शी आणि पदाशी प्रामाणिकपणा ठेवून काम केले तर प्रत्येक काम हे यशाच्या शिखारापर्यंत पोहचते. शासनाच्या योजना राबविणे, जनतेच्या हिताच्या दृष्टीने नवनवीन योजना आखणे हे प्रशासन अधिकाऱ्याचे काम आहे. तेच काम मी या प्रशासनात करणार.
– ज्योती सुरेश भगत

(दैनिक प्रभातवरून साभार)

Share This Article