स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? धोनीकडून शिका या ५ गोष्टी…
नुकतीच आपल्या सर्वांच्या आवडत्या महेंद्रसिह धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. कॅप्टन कूल धोनी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आम्हाला नेहमीच “कनेक्टिंग डॉट्स” आढळून येतात. धोनीकडून सर्वांनीच शिकण्यासारखं बरंच काही आहे. परंतु त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय शिकायला हवं हे आज आपण जाणून घेऊ…
१) एकाग्रता
स्पर्धा परीक्षांमध्ये एकाग्रता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. धोनीकडून हि एकाग्रता शिकण्यासारखी आहे. एकदा मैदानावर उतरल्यावर क्रिकेट व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच गोष्टींचा तो विचार करत नाही. एम एस धोनी या त्याच्यावरील बायोपीकमध्ये देखील आपण हे पहिले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना तुम्हाला आपल्या व्यक्तिगत जीवनातील गोष्टी बाजूला ठेवता आल्या पाहिजे. अभ्यासाच्या वेळी फक्त अभ्यास…!
२) स्वतःहून जबाबदारी स्वीकारा
२०११चे विश्वचषक तुम्हाला लक्षात असेलच… विश्वचषकाच्या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला लवकर आला होता. धोनीला हे माहिती होते की, त्याच्याकडून छोटीशी जरी चूक झाली तर सामना हातातून जाऊ शकतो व त्याला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे लागते. पण, धोनीने स्वतःवर आत्मविश्वास होता. त्यामुळेच भारताला ते विश्वचषक जिंकण्यात यश आले होते. यामुळे आत्मविश्वासाने नवीन जबादारी स्वीकारा. जीवनात आपण मोठे ध्येय साध्य करायच या उद्देशातून स्पर्धा परीक्षांकडे वळले आहोत तर अथार्त जास्त कष्ट घेणे ही आपली अपरिहार्य जबाबदारीच आहे आणि त्यात आपले १००% देऊ, तेव्हाच यश तुमचे असेल.
३) दबावात अजून चांगले प्रदर्शन
खरं तर जेव्हा खेळाडूंवर जास्त दबाव येतो, तेव्हा त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटते आणि तो काही तरी चूक करतो. पण, धोनीचे या उलट होते. धोनीवर जितका अधिक दबाव तितका त्याचा खेळ अजून खुलून उठतो. यासाठीच धोनी जगप्रसिद्ध आहे. धोनीकडून आपण हे शिकायलाच हवं. ठराविक वेळेत आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. यात सुरवातीला थोडी चूक झाली कि आपण पुढे संपूर्ण परीक्षेत चुका करत बसतो. हे प्रकर्षाने टाळणे आवश्यक आहे.
या सोबतच ऐन परीक्षेच्या वेळी कमी दिवसात Final Revision करणे ही बाब सारखीच नाही का ? या वरच पुष्कळदा तुमचं यश अवलंबून असते हे विसरता कामा नये.
४) अपयशाने खचून जाऊ नका
आज धोनीचे सर्वत्र कौतुक होत असेल पण त्याचा सुरवातीचा काळ असा नव्हता. भारतीय संघात आपले स्थान भक्कम करण्यासाठी सुरवातीच्या काळात त्याला फारच मेहनत घ्यावी लागली आहे. तसे पाहिले तर धोनीने अनेकवेळा पराभवाचा सामना केला आहे. पण, त्याने त्याच्या पराभवाचा स्वत:वर आणि संघाच्या कामगिरीवर प्रभाव पडू दिला नाही. आपल्या पराभवाचाही त्याने खंबीरतेने स्विकार केला आणि त्यातून नव्या गोष्टी शिकल्या असल्याचे आपण पहिले आहे. याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकांना अपयश येत असते. पण या अपयशाने खचून न जाता अधिक जोमाने पुढील परीक्षेच्या तयारीला आपण लागले पाहिजे.
५) इतरांचा सन्मान करा
धोनी कायमच इतरांशी सन्मानाने वागत आलाय. इतकं प्रचंड यश मिळवल्यावरही धोनीच्या वागण्यात विनम्रता होती. त्याच्या याच स्वभावामुळे सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंगसारखे दिग्गज खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळू शकले. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतांना आपल्या सिनियर्स प्रमाणे ज्युनियर विद्यार्थ्यांशी देखील विनम्रतेनेच वागा. एखादे यश आले तर लगेच हवेत न जात जमिनीवर राहा.
या सगळ्यांवर विचार करा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
वरील मुद्दे आवडल्यास हा लेख नक्की शेअर करा.
खूप छान