MPSC Current Affairs | Chalu Ghadamodi | 25 July 2022
केरळमधील वायनाडमध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हरची नोंद
केरळमधील वायनाड जिल्ह्यात आफ्रिकन स्वाइन फिव्हरची नोंद झाली आहे. 22 जुलै 2022 रोजी केरळचे पशुसंवर्धन मंत्री जे चिंचुराणी यांनी ही माहिती दिली. राज्यात आफ्रिकन स्वाइन फिव्हरच्या अधिकृत संख्येची अद्याप पुष्टी झालेली नाही.
वायनाड जिल्ह्यातील दोन फार्ममधील डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फिव्हरची पुष्टी झाली आहे, त्यानंतर मृत प्राण्यांचे नमुने या रोगासाठी सकारात्मक आढळले आहेत. अहवालानुसार, एका महिन्यात या रोगामुळे मनंथवडी आणि तविन्हल येथील फार्ममध्ये ४३ हून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या शेतातून आफ्रिकन स्वाइन फिव्हर आढळून आला आहे त्या शेतांना भेटी देणे अपेक्षित आहे.
अहवालानुसार, वायनाड जिल्ह्यातील फार्ममधील डुकरांना मारण्यासाठी वरिष्ठ पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक मनंथवादी ए. दयाल यांच्या नेतृत्वाखाली 12 सदस्यीय जलद प्रतिसाद पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 24 जुलैपासून फार्ममध्ये 349 हून अधिक डुकरांना मारले जाण्याची शक्यता आहे.
आफ्रिकन स्वाइन फिव्हरच्या लक्षणांमध्ये डुकरांमध्ये ताप, मळमळ आणि अतिसार यांचा समावेश होतो. आफ्रिकन स्वाइन फीवर हा रक्तस्त्रावजन्य रोग आहे जो डुकरांसाठी घातक आहे. सध्या आफ्रिकन स्वाइन फिव्हरवर कोणतीही प्रभावी लस नाही. आफ्रिकन स्वाइन फिव्हर हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. केंद्र सरकारने रहिवाशांना डुकराचे मांस खाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने जोडणारे हिमाचल प्रदेश पहिले राज्य
व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (VLTD) ने सुसज्ज असलेली सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली (ERSS) शी जोडणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आता व्हीएलटीडीच्या माध्यमातून या वाहनांचा देशभरात कुठेही मागोवा घेता येणार आहे. 9,423 हून अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे आणि ERSS शी जोडली गेली आहे. आता पोलिस आणि वाहतूक विभाग या दोघांकडून त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
शिमला येथील पीटरहॉफ येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी या प्रणालीचे औपचारिक उद्घाटन केले. सार्वजनिक वाहनांमध्ये महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणाची सुविधाही त्यांनी सुरू केली.
इमर्जन्सी पॅनिक बटण सिस्टीम आणि कमांड कंट्रोल सेंटरसह व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम 112 शी जोडले गेले आहे. जेव्हा पॅनिक बटण दाबले जाते तेव्हा सॅटेलाइटद्वारे 112 वर सिग्नल मिळेल आणि संकटात सापडलेल्या व्यक्तीला कनेक्ट करून पोलिसांना सतर्क केले जाईल.
केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल
केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस-रात्र म्हणजे २४ तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. तसेच पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करता येणार आहे.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांना याबाबत पत्र दिले आहे.
भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये २० जुलै २०२२ च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरीकांच्या घरी तिरंगा फडकवता येणार आहे.
ध्वज संहिता-२००२ आणि ‘राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा-१९७१ अंतर्गत राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम सांगण्यात आले आहेत. या ध्वज संहितेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होता. तसेच पॉलिस्टरचे आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांना परवानगी नव्हती. मात्र, आता पॉलिस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करण्याची परवनागी देण्यात आली आहे. तसेच २४ तास तिरंगा फडवण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे जागतिक आणीबाणी
जगातील ७० हून अधिक देशांत मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शनिवारी जागतिक आणीबाणी जाहीर केली. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले.
‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक ट्रेडॉस अधनॉम घेब्रेयेसस यांनी ‘डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसतानाही जागतिक आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेच्या प्रमुखाने सदस्यांमध्ये एकमत नसताना, अशी कृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मंकीपॉक्स हा रोग अनेक दशकांपासून मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांत ठाण मांडून आहे. परंतु आफ्रिका खंडाबाहेर तो पसरल्याची माहिती मेपर्यंत कोणालाही नव्हती. युरोप, उत्तर अमेरिका आणि अन्यत्र या रोगाचे रुग्ण आढळल्यानंतर त्याची साथ पसरल्याचे लक्षात आले.
‘डब्ल्यूएचओ’ने यापूर्वी अनेकदा असाधारण परिस्थिती उद्भवल्याने जागतिक आणीबाणी जाहीर केली होती. २०१९ची जागतिक करोना विषाणी साथ, पश्चिम आफ्रिकी इबोला साथीचा २०१४चा उद्रेक, २०१६मधील लॅटिन अमेरिकेतील झिका विषाणूची साथ आणि पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी सुरू असेलेले जागतिक प्रयत्न ही त्याची अलीकडील काही उदाहरणे आहेत.
अमेरिकेच्या केंद्रीय रोगनियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेच्या आकडेवारीनुसार जगातील ७४ देशांमध्ये मेपासून १६,००० हून अधिक रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तथापि, केवळ आफ्रिकेतच मंकीपॉक्सच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मंकीपॉक्स विषाणूचा अतिघातक प्रकार प्रामुख्याने नायजेरिया आणि काँगोमध्ये फैलत आहे.