1) आता चेहऱ्यावरूनही आधारची पडताळणी
आधारच्या सुरक्षेसाठी यूआयडीएआयने ओळख पटवण्यासाठी बोटांचे ठसे व डोळ्यांच्या बाहुल्यांसह आता फेस रिकग्निशनचाही समावेश करण्यात आला आहे. ज्यांचे बोटांचे ठसे उमटत नाहीत वा डोळ्यांच्या बाहुल्यांनीही पडताळणी होऊ शकत नाही, त्यांच्यासाठी ही नवी सुविधा असून ती १ जुलैपासून लागू होईल. चेहऱ्याची ओळख फ्यूजन मोडमध्येच स्वीकारली जाईल. म्हणजे चेहऱ्याच्या ओळखीसह बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बाहुल्या किंवा ओटीपीपैकी एक पर्याय असेल. UIDAI चे सीईओ आजय भूषण पांडे यांनी या फिचरची माहिती ट्वीटरवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, UIDAI लोकांची ओळख पटवण्यासाठी आणखी एक तंत्रज्ञान आणत आहे – फेस ऑथेंटिकेशन. या फिचरमुळे वयस्कर आणि ज्यांच्या फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशनमध्ये अडचणी येतात त्यांना मदत मिळेल. 1 जुलै 2018 पासून ही सेवा सुरू केली जाईल. UIDAI ने म्हटले आहे की, आता आधार नोंदणीसाठी लोकांच्या चेहऱ्यांचे फोटोही घेतले जातील.
आधार डाटाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI)ने बुधवारी व्हर्च्युअल आयडीच्या नव्या सिस्टीमची घोषणा केली. कोणत्याही
ग्राहकाला त्याचा 12 डिजीटचा आधार क्रमांक सांगायचा नसेल तर व्हर्च्युअल आयडी दिला जाऊ शकतो.
सर्व एजन्सी 1 जूनपासून याच आयडीच्या माध्यमातून व्हेरीफिकेशन करतील. आधार धारकाला युआयडीएआयच्या वेबसाइटद्वारे हा आयडी मिळवता येईल. 16 डिजीटच्या व्हर्च्युअल आयडीचा वापर पर्याय म्हणून सिम व्हेरीफिकेशनसह अनेक स्कीममध्ये केवायसीसाठी होईल.
2) सौदी अरबमध्ये तब्बल 39 वर्षांनी चित्रपटाचे प्रदर्शन
सौदी अरब सरकारने डिसेंबरमध्ये चित्रपटावरील बंदी हटवल्यानंतर ३९ वर्षांनी अॅनिमेशनवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला. जेद्दाह शहरात टेंटचे तात्पुरते सिनेमागृह उभारून प्रोजेक्टरच्या मदतीने चित्रपट दाखवला गेला. या वेळी महिला, मुलांनी गर्दी केली होती. सध्या तात्पुरत्या सिनेमागृहात चित्रपट दाखवला जात असून नवीन सिनेमागृहांचे निर्माण केले जात आहे. पहिले सिनेमागृह मार्चपर्यंत जेद्दाहमध्येच उभारले जाईल. देशात एकूण ३०० सिनेमागृहे उभारली जातील. चित्रपट कंपनी-७० ला देशात चित्रपट प्रदर्शनाची परवानगी मिळाली. चित्रपटांमुळे देशाची सांस्कृतिक, धार्मिक ओळख नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करत १९७९ मध्ये बंदी घातली गेली. अरबमधील नागरिक चित्रपट किंवा नाटक पाहण्यासाठी बहरीन किंवा संयुक्त अरब अमिरातमध्ये जात होते. चित्रपट प्रदर्शनावरील बंदी उठवल्याने मनोरंजनासाठी नागरिकांना दुसऱ्या देशात जाण्याची गरज पडणार नाही व देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचे सौदी अरब संस्कृती आणि माहिती मंत्रालयाने म्हटले. सिने उद्योगातून पुढील १० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेत १.५ लाख कोटी रुपयांची भर पडेल. ३० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
3) २६/११ हल्ल्यातून बचावलेला मोशे १० वर्षांनी मुंबई दौऱ्यावर
२६/११ दहशतवादी हल्ल्यातून वाचलेला बेबी मोशे आपल्या आजी आजोंबासोबत भारतात दाखल झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेनामिन नेतान्याहू यांच्या शिष्टमंडळासह तो भारतात आला आहे. मोशे नेतान्याहू यांच्यासमवेत छाबड हाऊसला भेट देणार आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी छाबड हाऊसवरदेखील हल्ला केला होता. या हल्ल्यात मोशेचे आई- वडील मारले गेले होते, तेव्हा मोशे दोन वर्षांचा होता. त्यानंतर संगोपनासाठी त्याच्या आजी आजोबांनी त्याला इस्रायला नेलं होतं. मोशे या घटनेनंतर दुसऱ्यांदा भारतात आला आहे.
4) ९ ते १८ मार्च या कालावधीत रंगणार स्पर्धा
महाराष्ट्र राज्य कुस्ती वर्तुळात चर्चेत असलेली ‘महाराष्ट्र कुस्ती लीग’ ९ ते १८ मार्च या कालावधीमध्ये खेळवली जाणार आहे. कुस्तीचा खेळ महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचवण्यासाठी ‘ताकदीची कुस्ती आणि मनोरंजनाची मस्ती’ हे घोषवाक्य घेऊन झी टॉकीजने या लीगचे आयोजन केले आहे. या लीगच्या सर्व लढती पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभा सदस्य सुभाष चंद्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत लीगची मुंबईत घोषणा करण्यात आली.
5) जागतिक आर्थिक परिषद मुंबईत
वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज यांनी येत्या २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान सातव्या जागतिक आर्थिक परिषदेचे आयोजन केले आहे. मुंबईतील जागतिक व्यापार केंद्रामध्ये तीन दिवस ही परिषद भरणार आहे. या परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा, प्रधर्शन, पुरस्कार प्रदान तसेच हॅंडबुकचे प्रदर्शनही करण्यात येणार आहे. धोरणकर्ते तसेच व्यवसायातील अग्रणींना व्यवसायवृद्धी तसेच कृषी, उत्पादन क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी या परिषदेचा उपयोग होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. परिषदेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचेही सहकार्य लाभणार आहे.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.