Current Affairs 18 January 2018
1) भारतीय शेअर बाजार सुसाट
ग्लोबल मार्केटच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्समुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी उसळी घेतली. सुरुवातीच्या व्यवसायीक कामामध्ये बॅंक, ऑटो क्षेत्रासह सर्व क्षेत्रात निर्देशांकात वाढ पाहायला मिळाली. निफ्टी 10,887.50 च्या टप्प्यावर पोहोचला आहे. तर सेंसेक्सने 35476.87 चा नवीन उंच्चाक गाठला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी ऐतिहासिक कामगिरी केली होती.
2) राज्याच्या स्टार्टअप धोरणास मान्यता
राज्यात उद्योजकता वाढीस लागण्यासोबत नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, यासाठी स्टार्टअप धोरण राबवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यानुसार पुढील ५ वर्षांत जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा निर्मिती आदी क्षेत्रांत नावीन्यपूर्ण संकल्पना राबवण्यास उद्योजकांना प्रोत्साहन दिले जाईल. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाचे राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या सह-अध्यक्षतेतील महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या माध्यमातून हे धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत स्टार्टअपकरिता नावीन्यपूर्ण क्लस्टर विकसित करण्यात येतील. त्याचप्रमाणे स्टार्टअप उद्योगांना विविध प्रकारच्या सेवा व सुविधा पुरवण्यासाठी उच्च शैक्षणिक संस्था, संशोधन व विकास संस्था आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या सहकार्याने इन्क्युबेटर्स, तीन जागतिक दर्जाचे अॅक्सलरेटर्स व स्कॅलेरटर्स तसेच स्टार्टअप पार्क विकसित
करण्यात येतील. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळांमध्ये टिंकरिंग लॅब उभारण्यात येतील. स्टार्टअपना निधी उपलब्ध होण्याकरिता फंड ऑफ फंड्सद्वारे ५०० कोटी रुपयांचा निधी स्थापित करून क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील स्टार्टअप उद्योगांना ५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.
* ५ वर्षांच्या (२०१७-२०२२) कालावधीसाठी उद्दिष्टे
– शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रांच्या साहाय्याने किमान १५ इनक्युबेटर्सचा विकास
– एंजल व सीड फंडच्या माध्यमातून ५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणे
– किमान १० हजार स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक ती मदत करणे
– प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ५ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे
*असे असेल धोरण
धोरणानुसार नोंदणी झाल्यापासून सात वर्षे कालावधीची आस्थापना ही स्टार्टअप म्हणून गणली जाईल. मात्र, सामाजिक क्षेत्र आणि बायोटेक्नॉलॉजी स्टार्टअपसाठी हा कालावधी १० वर्षे राहील. तसेच स्टार्टअपची वार्षिक उलाढाल २५ कोटींच्या मर्यादेत असेल. स्टार्टअप उद्योगांना ठरावीक नमुन्यात माहिती सादर करता येईल. ७ वर्षांच्या कालावधीत त्यांचे निरीक्षण केले जाणार नाही. स्टार्टअप शासनाचे साहाय्य प्राप्त करणाऱ्या उद्योगांनी स्टार्टअपकडून किमान १० टक्के खरेदी, मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्काची पहिल्या टप्प्यात १०० % व दुसऱ्या टप्प्यासाठी ५० % भरपाई, भारतीय पेटंटसाठी २ लाख व आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी १० लाखांपर्यंत (८० % मर्यादेत) सवलत, राज्य वस्तू व सेवा कराच्या रकमेची शासनामार्फत प्रतिपूर्ती इत्यादी सवलती धोरणात अंतर्भूत आहेत.
3) बाळासाहेबांच्या नावे ग्रा.पं. बांधणी योजना
स्वत:ची कार्यालये नसलेल्या राज्यातील ४ हजार २५२ ग्राम पंचायतींना आता कार्यालये बांधून दिली जाणार असून त्या योजनेस बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना असे नाव देण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने या बाबत आज घेतलेल्या निर्णयाची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रपरिषदेत दिली. दोन हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या दुर्गम भागातील ग्राम पंचायतींच्या इमारती या योजनेंतर्गत बांधण्यात येणार आहेत. या योजनेनुसार स्वतंत्र इमारत नसलेल्या एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १२ लाख आणि एक हजार ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना १८ लाख निधी मंजूर करण्यात येणार आहे. दोन हजारपेक्षापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वनिधीतून अथवा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर इमारत उभारता येईल. पीपीपी तत्त्वावर बांधकाम करण्यास प्रतिसाद मिळाला नसल्यास आज जाहीर केलेल्या योजनेतून इमारत उभारण्यास मान्यता मिळणार आहे.या योजनेवर चार वर्षांत ४४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
4) पारदर्शक प्रशासनासाठी पब्लिक क्लाउड धोरण
राज्य सरकारने पब्लिक क्लाऊड धोरण तयार केले असून त्यामुळे शासनाच्या सर्व विभागांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. संगणकीकरणामुळे सर्वच विभागांना स्वत:चे डाटा सेंटर उभारणे, त्याचे व्यवस्थापन अशा तांत्रिक कामांची यंत्रणा उभारावी लागत असे. पब्लिक क्लाऊड धोरणामुळे तांत्रिक कामाचा ताण दूर होणार असून राज्य सरकारच्या सर्व विभागांना आपल्या विभागातील मुख्य कामाचा निपटारा करून परिणामांवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले. राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि फिक्की या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एम-टेक या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
5) मेघालय, त्रिपुरा व नागालंडमध्ये आचारसंहिता लागू
इशान्येकडील तीन राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योति यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन मेघालय, त्रिपुरा आणि नागालंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. तिन्ही राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालंडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होईल. 3 मार्चला मतमोजणी होईल. या तीन राज्यांत पहिल्यांदा ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅटचा (VVPAT) वापर करण्यात येणार आहे.
6) नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनला जाणारे ठरणार पहिले भारतीय पंतप्रधान
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. सत्तेत आल्यापासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी अनेक कारणांनिमित्त वेगवेगळे परदेश दौरे केले आहेत. मोदी हे भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक परदेशांचे दौरे करणारे पंतप्रधान असल्याचंही म्हटले जात आहे. सध्या इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचा नियोजित दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइन देशाला भेट देणार आहेत. नरेंद्र मोदी हे पॅलेस्टाइनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला ऐतिहासिक असं महत्त्व प्राप्त झाले आहे. 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनला रवाना होणार आहेत. जॉर्डनमधील अम्मनवरुन पंतप्रधान पॅलेस्टाइनच्या रामल्ला येथे जातील. तेथे त्यांचे नियोजित कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, पहिल्या तीन वर्षात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 27 देशांना भेट दिली तर मोदींनी पहिल्या 3 वर्षात तब्बल 49 देशांना भेट दिली आहे. वर्ष 2017 मध्ये नरेंद्र मोदी यांनी 14 देशांना भेट दिली तर 2018 वर्षातील परदेश दौ-याची सुरुवात ते पॅलेस्टाइनपासून करणार आहेत.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.