1) डॉ. हेपतुल्ला, आझाद यांना संसदीय पुरस्कार
भारतीय संसदीय गटाने (इंडियन पार्लमेंटली ग्रुप) तब्बल ५ वर्षांनी या वर्षी संसदेत भरीव कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्याचे ठरविले असून, डॉ. नजमा हेपतुल्ला यांची राज्यसभेतील कार्यासाठी (सन २०१३) निवड झाली आहे. त्या आता मणिपूरच्या राज्यपाल आहे. याखेरीज भाजपाचे हुकूमदेव नारायण यादव यांची लोकसभेतील कार्यासाठी (सन २०१४) निवड झाली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांची २०१५ सालच्या कामगिरीसाठी निवड करण्यात आली असून, तृणमूल काँग्रेसचे सदस्य दिनेश त्रिवेदी (लोकसभा) यांची २०१६ सालासाठी, तर बिजू जनता दलाचे भर्तुहारी मेहताब (लोकसभा) यांची २०१७ सालासाठी निवड झाली आहे. हे पुरस्कार १९९५ साली सुरू करण्यात आले होते आणि पहिला पुरस्कार माजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांना, तर त्यानंतरच्या वर्षांत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी व माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आले होते.
2) फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी
बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार विजेते खालील प्रमाणे –
– सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु
– सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार
– सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)
-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)
– सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)
– सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान)
– सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन)
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा – सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना – बद्रीनाथ की दुल्हनिया)
– सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा – सिनेमा जग्गा जासूस)
3) विजय गोखले भारताचे नवे परराष्ट्र सचिव
भारत-चीनदरम्यान डोकलामवरुन उद्भवलेला तिढा यशस्वीपणे सोडविणारे विजय केशव गोखले यांची भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून परराष्ट्र सचिवपद सांभाळत असलेले एस. जयशंकर यांच्या जागी विजय गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र सचिवपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असतो. पण जयशंकर यांना गेल्या वर्षी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. जयशंकर २८ जानेवारी रोजी पदमुक्त होतील. भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेले विजय गोखले हे दुसरेच मराठी अधिकारी आहेत. यापूर्वी रामचंद्र दत्तात्रय साठे यांनी ९ नोव्हेंबर १९७९ ते ३० एप्रिल १९८२ दरम्यान चरण सिंह आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना परराष्ट्र सचिवपद भूषविले आहे. दिल्ली विद्यापीठातून इतिहासात एम. ए. केल्यानंतर विजय गोखले १९८१ साली भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाले. सध्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव (आर्थिक संबंध) या पदावर कार्यरत असून त्यांनी हाँगकाँग, हनोई, बीजिंग आणि न्यूयॉर्क येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. दिल्ली मुख्यालयात कार्यरत असताना उपसचिव (वित्त), संचालक (चीन आणि पूर्व आशिया) तसेच संयुक्त सचिव (पूर्व आशिया) या पदांवर काम केले आहे. विजय गोखले मलेशियात जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान भारताचे उच्चायुक्त होते. ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ दरम्यान ते जर्मनीत भारताचे राजदूत होते. जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
4) सर्वांत स्वस्त देशः भारत दुसऱ्या क्रमांकावर
राहण्यासाठी तसेच निवृत्तीनंतर वास्तव्य करण्यासाठी भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्वस्त देश असल्याचे समोर झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात जगातील ११२ देशांमध्ये वास्तव्यासाठी सर्वांत स्वस्त देशाचा मान दक्षिण आफ्रिकेला मान मिळाला आहे. ‘गोबँकिंगरेट्स’तर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. चार निकषांच्या आधारे देशांची क्रमवारी ठरविण्यात आली आहे. खरेदी करण्याची क्षमता, घराचे भाडे (रेंट इंडेक्स), करण्यात येणाऱ्या किराणा मालाची खरेदी आणि ग्राहक किंमत निर्देशांक या आधारे करण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. रेंट इंडेक्सच्या आधारे राहण्यासाठी सर्वांत स्वस्त पन्नास देशांमध्येभारताचा दुसरा क्रमांक आला आहे. भारताच्या जवळपास नेपाळचा क्रमांक लागतो. या निकषानुसार अन्य देशांच्या तुलनेत भारत हा वास्तव्यासाठी सर्वांत स्वस्त देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू आणि किराणा सामानाच्या बाबतीत देशामध्ये सर्वाधिक स्वस्त शहराचा मान कोलकात्याला मिळाला आहे. कोलकात्यामध्ये दरमहा २८५ डॉलर अर्थात १८,१२४ रुपयांमध्ये एक व्यक्ती गुजराण करू शकते. सर्वेक्षणात १२५ कोटी लोकसंख्या असणारा आपला देश जगभरातील सर्वांत स्वस्त देशांमधील एक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. कोलकात्याव्यतिरिक्त देशातील अन्य शहरांची खरेदी करण्याची क्षमता (पर्चेसिंग पॉवर) अधिक असल्याचे आढळले आहे. सर्वेक्षणानुसार देशातील नागरिकांची क्रयशक्ती २०.९ टक्के अधिक असून, घरभाडे ९५ टक्के स्वस्त आणि किराण्याच्या किमती ७४.४ टक्के स्वस्त असल्याचे आढळून आले आहे. या शिवाय स्थानिक वाण सामान आणि सेवा ७४.९ टक्के स्वस्त असल्याचे म्हटले आहे.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.