1) आशियातील सर्वात मोठ्या बोगद्याला मंजुरी
आशियातील दोन्ही बाजूंनी कार्यरत राहू शकणारा सर्वात मोठा ‘झोजी ला’ खिंड बोगदा बांधण्यास केंद्र सरकारच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. या बोगद्याला ६,०८९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे श्रीनगर व लेह या प्रवासासाठी लागणारा वेळ साडेतीन तासांवरून १५ मिनिटांवर येणार आहे. हा बोगदा १४.२ किमी लांबीचा असून त्याच्यामुळे श्रीनगर, कारगिल, लेह यांच्यातील वाहतूक वर्षभर अखंड राहणार आहे. अन्यथा हिवाळ्यात बर्फवृष्टीनंतर त्यांच्यामधील संपर्क तुटतो. या समस्येवर हा बोगदा उत्तम तोडगा होऊ शकतो. पंतप्रधान नेतृत्व करत असलेल्या आर्थिक विषयक कॅबिनेट समितीने या बोगद्याच्या कामाला आज हिरवा कंदील दाखवला.
2) चीनची अरुणाचलमध्ये घुसखोरी
चीनच्या रस्तेबांधणी पथकांनी गेल्या आठवडय़ात अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे एक किलोमीटर आत घुसखोरी केली, मात्र भारतीय फौजांच्या विरोधानंतर त्यांना हुसकवण्यात यश आले. चीनची पथके ट्रॅक अलाइनमेंटच्या कामासाठी आली होती आणि भारतीय फौजांनी हटकले असता परत गेली; मात्र जाताना उत्खनन यंत्रांसह रस्ते बांधणीची विविध उपकरणे मागे ठेवली. चिनी पथकांच्या सदस्यांमध्ये नागरिक तसेच गणवेशधारी कर्मचारी होते, असे अरुणाचलमधील स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ही घटना २८ डिसेंबरला, म्हणजे सिक्कीम सेक्टरमधील डोकलाम येथे भारतीय व चिनी फौजांमधील ७३ दिवसांचा तिढा सुटल्यानंतर जवळजवळ ४ महिन्यांनी घडली.
3) नासाचे तंत्रज्ञान वापरून तिप्पट उत्पादन देणारी गव्हाची प्रजाती विकसित
नासा या अमेरिकी अवकाश संस्थेच्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी जगातील सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती विकसित केली आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन तीनपटींनी वाढणार आहे. नासाच्या प्रयोगात सतत सूर्यप्रकाशात रोपे राहतात. यात रोपांची वाढ खूप झपाटय़ाने होते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील ली हिकी या संशोधकाने सांगितले, की जलद वाढ तंत्र वापरताना त्यात गहू, चवळी व बार्ली यांची सहा पिढय़ांतील रोपे तर कॅनोलाची चार पिढय़ांतील रोपे एका वर्षांत वाढवण्यात आली. यात विशिष्ट प्रकारचे काचगृह वापरण्यात आले होते. नियंत्रित वातावरणात वाढवण्यात आलेल्या प्रयोगात सूर्यप्रकाश भरपूर ठेवला होता. २०५०पर्यंत जगात अन्नधान्य उत्पादनात ६० ते ८० टक्के वाढ केली तरच लोकांना अन्न मिळू शकणार आहे, त्यामुळे उत्पादनवाढीच्या या प्रयोगाला महत्त्व आहे. २०५०पर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्ज असणार आहे. अधिक वेगाने वनस्पतींची वाढ करण्याचे प्रयोग हे संशोधनात केले जात होते ते आता प्रत्यक्ष वापरात आणण्याची वेळ आली आहे. डो अॅग्रोसायन्सेस बरोबर भागीदारीत हे तंत्र वापरून गव्हाची डीएस फॅरेडे ही नवी प्रजाती विकसित करण्यात आली असून, ती या वर्षीच वितरित होणार आहे.
4) राज्यसभेसाठी अखेर आपला उमेदवार मिळाले
आम आदमी पार्टीला (आप) अखेर राज्यसभेसाठी उमेदवार मिळाले असून पक्षाचे नेते संजय सिंह, सुशील गुप्ता, एन. डी. गुप्ता या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संजय सिंह हे आपचे संयोजक आहेत. ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनासोबत पहिल्यापासूनच जोडलेले आहेत. तर नारायण दास गुप्ता आपचे दोन वर्षांपासून चार्टर्ड अकाऊंट म्हणून काम पाहतात. तर तिसरे उमेदवार सुनील गुप्ता एक ट्रस्ट चालवतात. दिल्लीत राज्यसभेच्या ३ जागांसाठी १६ जानेवारीला निवडणूक होणार आहे.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.