1) ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाचे बदल
शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करिता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांसाठी येत्या २४ जानेवारीपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन बदलानुसार जे विद्यार्थी २०१७-२०१८ मध्ये पहिलीमध्ये शिक्षण घेत आहेत, ते वर्ष २०१८-२०१९ मध्ये पहिलीत प्रवेश घेण्यास पात्र राहणार नाही. नर्सरीसाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत तीन वर्षे पूर्ण तर पहिलीसाठी ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ५ वर्षे ८ महिने पूर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०१८- २०१९ या वर्षाकरिता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये (२५ टक्के) आरक्षित जागांसाठी डिसेंबर २०१७ मध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणे अपेक्षित होती. मात्र, याबाबत शिक्षण विभागाकडून कोणतीही अधिसूचना जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेशाबाबत प्रतीक्षा होती. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शिक्षणहक्कची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ‘आरटीई’ अंतर्गत इयत्ता पहिल्या वर्गापासून प्रवेश देण्यात येतात. काही शाळा नर्सरीमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेश देत असल्या तरी त्यांना ‘आरटीई’चे लाभ देता येत नाहीत. हे सर्व लाभ इयत्ता पहिलीपासूनच मिळतात. शासनाकडून शाळांना देण्यात येणारी प्रतिपूर्तीही इयत्ता पहिलीच्या प्रवेशापासूनच देण्यात येते. त्यामुळे ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश मिळवून पाल्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी अनेक पालक मागील वर्षी ‘आरटीई’मध्ये प्रवेश न मिळाल्यास पुन्हा दुसऱ्या वर्षीही इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी अर्ज करतात. मात्र, या वर्षापासून पालकांना असा लाभ घेता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये इयत्ता पहिलीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.
2) ‘जमात’, ‘जैश’सह ७२ अतिरेकी संघटना काळ्या यादीत
अमेरिकेने दहशतवाद्यांवर प्रभावी कारवाई न केल्याचे कारण पुढे करत पाकची तब्बल १६०० कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखून धरली आहे. यामुळे पाकची चांगलीच आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकने शनिवारी हाफिज सईदच्या ‘जमात उद दावा’ व ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’ तथा मौलाना मसूद अजहरच्या ‘जैश-ए-मोहम्मद’सह तब्बल ७२ अतिरेकी संघटनांना काळ्या यादीत टाकले आहे. यासंबंधीचा निर्णय सरकारने देशभरातील उर्दू वर्तमानपत्रांतून जाहीर केला आहे. यासंबंधीची जाहिरात देशातील सर्वच प्रमुख स्थानिक वृत्तपत्रांतही देण्यात आली आहे. ‘प्रस्तुत यादीतील संघटनांना दान किंवा प्रोत्साहन देणाऱ्यांना तब्बल १० वर्षांची कैद व आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल,’ असे सरकारने स्पष्ट केले आहे. ‘नागरिकांनी या संघटनांना कोणतेही दान देऊ नये. विशेषत: त्यांच्या संशयास्पद कारवायांची माहिती मिळाली, तर ती १७१७ या क्रमांकावर कळवावी,’असे पाकच्या गृहमंत्रालयाने यासंबंधी स्पष्ट केले आहे.
3) चंद्रावर चाललेले ‘नासा’चे विक्रमी अंतराळवीर कालवश
तब्बल सहा वेळा अंतराळात प्रवास करून विक्रम नोंदविणारे अमेरिकेचे महान अंतराळवीर जॉन यंग यांचे निधन झाले आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘नासा’ने त्यांच्या निधनाची माहिती माध्यमांना दिली. ८७ वर्षीय जॉन यंग यांचे ह्युस्टनमधील राहत्या घरी शुक्रवारी उशिरा रात्री निधन झाल्याचे ‘नासा’ने म्हटले आहे. न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात आले आहे. नासा आणि जगाने एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व गमावल्याचे ‘नासा’चे प्रशासक रॉबर्ट लिघटफूट म्हणाले. ‘नासा’च्या जेमिनी, अपोलो अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होऊन सहा वेळा अंतराळ प्रवास करण्याचा विक्रम जॉन यांनी नोंदविला आहे. अंतराळ शटल मोहिमातही त्यांनी सहभाग नोंदविला आहे. अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्याचा विक्रमही त्यांच्या नावे होता. यंग यांनी गुस ग्रिसम यांच्यासोबत जेमिनी-३ मोहिमेत सहभाग नोंदविला होता. त्यानंतर पहिल्या अंतराळ शटल मोहिमेसह जेमिनी-१० मोहिमेची धुराही त्यांनी सांभाळली होती. तर अपोलो-१० मोहिमेदरम्यान चंद्राला प्रदक्षिणा त्यांनी घातली होती. अपोलो-१६ मोहिमेदरम्यान ते चंद्रावरही उतरले होते. या मोहिमेदरम्यान त्यांनी चार्ल्स ड्युक यांच्यासह चंद्राच्या पृष्ठभागावरून जवळपास ९० किलो माती व दगडाचे नमुने गोळा केले होते. तसेच चंद्राच्या स्पूक क्रेटरमध्ये रोव्हरच्या साहाय्याने २६ किलोमीटरचा प्रवासही केला होता. अमेरिकन नौदलातील पायलट असलेल्या यंग यांनी दलात कार्यरत असताना एफ-४ फॅन्टम-२ जेटच्या साहाय्याने वेगवान उड्डाणाचाही विक्रमही नोंदविला होता.
4) इस्रो १० जानेवारीला कार्टोसॅटसह ६ देशांचे ३१ उपग्रह पाठवणार
भारत १० जानेवारीला आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून पृथ्वीचा अभ्यास करणारे कार्टोसॅटसह ३१ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. त्यापैकी २८ उपग्रह अमेरिकेचे आणि पाच इतर देशांचे असतील. २०१८पूर्वी अंतराळ मोहिमेंतर्गत ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाच्या (पीएसएलव्ही-सी ४४०) माध्यमातून ३१ उपग्रह प्रक्षेपित केले जातील. या मोहिमेद्वारे चार महिन्यांपूर्वी नौका मोहिमेचा ८ वा उपग्रह सोडला होता; परंतु अग्निबाण पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवण्यास अयशस्वी ठरला. या मोहिमेत कार्टोसॅट-२ शिवाय भारताचा एक नॅनो (सूक्ष्म) उपग्रह व एक मायक्रो (अतिसूक्ष्म) उपग्रहही प्रक्षेपित हाेईल. याच्या माध्यमातून कार्टोसॅट शहरी व ग्रामीण नियोजन, रस्त्यांचे जाळे, किनारपट्टी निगराणी ठेवता येईल.
5) अशोक चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम
देशातील सर्व प्रदेश काँग्रेस, विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षांना त्यांच्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण व मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी खासदार संजय निरुपम पदावर कायम राहणार आहेत. त्यांचा कालावधी मार्च २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे. या दोघांच्या जागी वर्णी लागावी यासाठी पक्षातील काही इच्छुकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. चव्हाण, निरुपम यांची फेरनियुक्ती झालेली नाही, त्यांच्या पदांना दिलेली मुदतवाढ तांत्रिक आहे, काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या निवडणुका अद्याप व्हायच्या आहेत, त्या झाल्यानंतर नवे अध्यक्ष एक विशेष अधिवेशन घेतील. त्या अधिवेशनामध्ये प्रदेश काँग्रेसच्या फेरनियुक्त्या होऊ शकतात, हे अधिवेशन आगामी २ महिन्यांत होऊ शकते, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.
MSPC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर फॉलो करा.