एमपीएससी मंत्र : गट क सेवा बुद्धिमत्ता चाचणी
पहिली गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सन २०१८ मध्ये झाली. पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या घटकविषयांचे प्रश्न कमी जास्त होत असले तरी बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची प्रश्नसंख्या स्थिर असते. पहिल्या पूर्वपरीक्षेमध्ये या घटकावर १५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. एकूण १०० पैकी १५ गुणांसाठीच्या या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आह
सन २०१८ मध्ये पुढील उपघटकांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.
* व्यक्तींचा छंद, व्यवसाय, शिक्षण यांचे संयोजन,
* सांकेतिक भाषा,
* आकृतीमधील गणिती प्रक्रिया,
* संख्यामालिका,
* बैठक व्यवस्था व दिशा,
* अंकाक्षर सांकेतिक भाषा,
* काळ-काम / अंतर-वेग,
* वेग, त्रिकोणमितीवर आधारित वेगाचे गणित,
* ठोकळे,
* टक्केवारी,
* गुणोत्तर व प्रमाण
सर्वसाधारणपणे हेच उपघटक दरवर्षी विचारले जातील असे गृहीत धरता येईल. मात्र काही उपघटकांवर एकापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेले असल्यामुळे काही उपघटक कमी-जास्त होण्याची शक्यता गृहीत धरणे आवश्यक आहे. वरील उपघटक केंद्रस्थानी ठेवून त्याबरोबरीने काही अतिरिक्त घटक तयार करणे आवश्यक आहे. पुढीलप्रमाणे तयारी करणे व्यवहार्य ठरेल.
* पायाभूत गणिती सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर गणिती प्रक्रिया कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.
* शेकडेवारी, व्याज, नफा तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण हे पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.
* वरील पाच घटकांबरोबरच समीकरणे, काळ-काम-वेग-अंतर हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत.
* या प्रक्रिया सोडविण्याची सूत्रे पाठ असायला हवीतच पण त्यांचे नेमके उपयोजन करता येणे महत्त्वाचे आहे. नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी, कोणते सूत्र वापरायला हवे हे लक्षात येण्यासाठी सराव महत्त्वाचा आहे.
* संख्यामालिका सोडविण्यासाठी १ ते ३०पर्यंतचे पाढे, १ ते २०पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या मूलभूत गोष्टींबरोबर अंकाक्षर मालिकाही विचारल्या जाऊ शकतात. आकृतींमधील संख्यांवर आधारित प्रश्नांसाठीही ही तयारी आवश्यक आहे.
* तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती, नातेसंबंध, बैठकव्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात. निष्कर्ष पद्धती, नातेसंबंधांवर मागच्या वर्षी प्रश्न विचारलेले नसले तरी त्यांची तयारी करणे आवश्यक आहे.
* प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामागचे नेमके तर्क समजून घेतल्यास हे प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.
* निष्कर्ष पद्धतीमध्ये प्रथमदर्शनी विचित्र वा असंबद्ध वाटणारी दिलेली विधाने खरी मानून त्यांची माडणी वेन आकृत्यांमध्ये करावी. यातून येणारे निष्कर्ष दिलेल्या पर्यायांतून शोधावेत किंवा त्या आधारे दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय शोधावा.
* नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:ला कल्पून ते प्रश्न सोडवावेत.
* वर्तुळाकार बैठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात ठेवून मांडणी करावी.
* व्यक्तींचा क्रम, छंद, व्यवसाय यांच्या संयोजनावरील प्रश्न सोडविण्यासाठी दिलेली माहिती टेबलमध्ये भरत गेल्यास अचूक उत्तरापर्यंत पोचता येते.
* आकृती मालिका, अक्षर मालिका, सांकेतिक भाषा, घडय़ाळ, कॅलेंडर या महत्त्वाच्या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले नसले तरी सरावामध्ये त्यांचा समावेश आवश्यक आहे.
* आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषण क्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो.
* अक्षरमालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.
* सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.
हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. चौथी व सातवी शिष्यवृत्तीची गाईड्स, आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाईड्स तसेच स्पर्धा परीक्षा अंकगणित या आणि अशा वरील घटकांचा समावेश असणाऱ्या पुस्तकांचा वापर करावा. राष्ट्रचेतनाचे गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा अभ्यास प्रश्नपत्रिका हे तसेच अगरवाल यांचे यावरील पुस्तक यासाठी उपयोगी ठरतील.
-फारूक नाईकवाडे