मागील लेखामध्ये दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अर्थव्यवस्था या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे.
अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
या उपघटकांची तयारी करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहू.
* राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापार, मुद्रा, बँकिंग आणि राजकोषीय नीती.
* राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनपी) यातील फरक समजून घेणे व त्याबाबतची अद्ययावत आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे.
* भारताच्या परकीय व्यापारातील महत्त्वाचे भागीदार देश, सर्वात जास्त आयात / निर्यात होणारे देश किंवा संघटना, आयातीमधील व निर्यातीमधील सर्वाधिक मूल्य / वाटा असणाऱ्या वस्तू या बाबी सारणी पद्धतीत मांडून त्याचा अभ्यास करता येईल. यातील महत्त्वाच्या बाबींची मागील वर्षांच्या आकडेवारीशी तुलना करता आल्यास उत्तम.
* चलनविषयक मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे रिझव्र्ह बँक, तिचे अधिकार, कार्ये, विविध दर यांचा आढावा घ्यावा.
* बँकिंगविषयक विविध व्याजदर, बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचा आढावा घ्यायला हवा.
* राजकोषविषयक संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. राजकोषीय तूट, आधिक्य, त्यांचा अर्थ, कारणे, परिणाम या बाबी परीक्षेत विचारल्या जात नाहीत पण त्या समजून घेतल्याशिवाय आत्मविश्वासाने पेपर सोडविणे सोपे होणार नाही.
* शेती, उद्योग
* शेती क्षेत्र याचा अर्थ प्राथमिक क्षेत्र असा घेऊन अभ्यास करायचा आहे. कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय या सर्व बाबींचा समावेश अभ्यासामध्ये करायला हवा.
* या क्षेत्रातील वृद्धीचे ट्रेंड, कमी उत्पादकतेची कारणे, उत्पादनास चालना देणाऱ्या विविध योजना यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
* आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे कायदे वा तरतुदी यांचा समावेश होतो. या सर्व बाबी चालू घडामोडींचाच एक भाग आहेत.
* महत्त्वाचे उद्योग व त्यांच्यासाठी प्रसिद्ध शहरे / क्षेत्रे, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण धोरण, खासगी उद्योगांचे प्रकार, उद्योग क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
* प्राथमिक व उद्योग क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा, आयात व निर्यातीमधील वाटा माहीत असायला हवा.
* दारिद्रय़ व बेरोजगारी
* दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारशी माहीत असायला हव्यात.
* रोजगारविषयक संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. रोजगारविषयक निर्देशांक व ठळक अद्ययावत आकडेवारी नेमकेपणाने माहीत असायला हवी.
* राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी.
* पंचवार्षिक तसेच इतर योजनांत दारिद्रय़ निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम त्याची उद्दिष्टय़े आणि परिणाम यांचा आढावा घ्यावा.
* रोजगारनिर्मितीसाठीच्या तसेच स्वयंरोजगाराबाबतच्या महत्त्वाच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.
* कौशल्य विकासासाठीच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.
* अशा योजनांमधील तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, उद्दिष्टे यांचा अभ्यास आवश्यक आहे.
* लोकसंख्या अभ्यास
* सन २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीमधून एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या, नागरीकरण अशा घटकांची सारणी पद्धतीत मांडणी करून त्याची टिप्पणे काढून अभ्यास करणे सोपे व व्यवहार्य ठरेल.
* वरील सर्व मुद्दय़ांची सन २०११ व सन २००१मधील आकडेवारी / माहितीशी तुलना करणारी सारणी तयार करता आल्यास तोही उपयुक्त ठरेल.
* राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, धोरणाची उद्दिष्टय़े, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग – रचना, उद्दिष्टय़े, कार्यपद्धती हे घटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.
* जन्मदर, मृत्यूदर, जननदर, जन्मावेळचे आरोग्यमान यांबाबत ठळक बाबी व आकडेवारीचा आढावा घ्यावा.
* शासकीय अर्थव्यवस्था
* अर्थसंकल्प मुद्दय़ामध्ये याबाबतची कायदेशीर प्रक्रिया, अर्थसंकल्पातील तूट/आधिक्य व त्याचे परिणाम, यातील संकल्पना समजून घ्यायला हव्यात. त्या त्या वर्षांतील अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, योजना यांचा अभ्यास गरजेचा आहे.
* महसुली उत्पन्न, करांचे प्रकार व त्यांचा एकूण महसुलातील वाटा माहीत असायला हवेत.
* लेखा व लेखापरीक्षण याबाबत भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांचे अधिकार व कार्ये समजून घ्यावीत.
* अनुषांगिक तयारी
* व्यापार सुलभता/ दारिद्रय़/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी याचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे माहीत असावेत.
* पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आखलेल्या धोरणांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.
– फारुक नाईकवाडे
सदर लेख हा दैनिक लोकसत्ता मधील आहे