अखेर MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली
राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होऊ घातलेली राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा (MPSC Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी देखील गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष रस्त्यावर या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घावा, अशी मागणी केली जात होती.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बोलावलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असं देखील या बैठकीत ठरल्याचं सांगितलं जात आहे.
परीक्षा रद्द करण्याची मागणी कोणी केली होती?
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. एमपीएसी समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना आणि प्रातिनिधीक स्वरुपात सोलापूर, अहमदनगर,सातारा, हिंगोली यवतमाळ, मुंबई, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर यासह राज्यभरातील विविध शहरातील विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.