आई-वडिलांच्या कष्टाचे झाले सार्थक ; खासगी बस चालकाचा मुलगा झाला PSI
MPSC PSI Success Story : भोर तालुक्यात आंबाडे हे छोटेसे गाव आहे. या गावातील अनिकेत खोपडे हा होतकरू आणि हुशार मुलगा. त्याचे वडील एका खासगी बसवर चालक आहेत. आई स्वाती खोपडे या घरकामासह जिरायती शेती करतात. दोघांनी मुलगा अनिकेत आणि मुलगी राजश्री यांना उच्चशिक्षित केले. तसेच दोघांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा दिली. कष्ट करून शिक्षणासाठी पाठिंबा दिला.
अनिकेत खोपडेचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण गावातीलच काळेश्वरी माध्यमिक विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथील शिवाजी विद्यालयात करून बी. एस्सी. चे शिक्षण अनंतराव थोपटे महाविद्यालयात पूर्ण केले. त्याला लहानपणापासून वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळे त्याने MPSC च्या परीक्षेसाठी तयारी सुरू केली.
दिवसरात्र अभ्यास तर केलाच पण शारीरिक क्षमता चाचणीसाठी मांढरदेवीच्या घाटात धावण्याचा सराव सुरू केला. दिवसभर अभ्यास आणि मैदानी सराव यामुळे अनिकेत खोपडे यासे पीएसआय(PSI) होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. ध्येय बाळगून केलेल्या कठोर परिश्रमाला निश्चितच यश मिळते हे त्याने दाखवून दिले आहे. सध्या त्याचे प्रशिक्षण चालू आहे.