MPSC PSI Success Story : घरची परिस्थिती बेताची… थोडीफार शेतीभाती…शेतमजूरीवर सारे कुटुंब चालत असे. बागणी वाळवा येथील हे कुटुंब चाळीस वर्षांपूर्वी कुटुंबावर बिकट परिस्थिती ओढवली त्यामुळे त्याचे आजी आजोबा वडील चुलते हे नवेखेड येथे राहण्यास आले. असा शेतमजुराच्या कुटुंबातील मुलगा राहुल राजेंद्र काईत. याची पोलीस उपनिरीक्षक पदी नुकतीच निवड झाली आहे.
कोणतीही सुखसोयी नसताना देखील बिकट परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून मिळवलेले यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.राहुलचे प्राथमिक शिक्षण नवेखेड च्या मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण बोरगाव हायस्कुल मध्ये झाले इस्लामपूर च्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातुन बी. एससीची पदवी मिळाल्यानंतर राहुलने राजर्षी शाहू अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
राहुलने शिक्षणाची कास सोडली नाही…संपूर्ण कुटुंबाचे कष्ट बघत राहुल ही लहानाचा मोठा झाला. त्याने ही काही दिवस कुटुंबाला मदत म्हणून एका दूध संस्थेत काम केले. स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर अधिकारी होवू आणि परिस्थिती बदलू या विचाराने त्याने अहोरात्र मेहनत घेतली. पण दोन वर्षांपूर्वी तो मुलाखतीपर्यंत गेला आणि अपयश पदरी पडले. त्यातच वडिलांचे निधन झाले.
त्याचे दुःख होते परंतू ते बाजूला सारून पुन्हा नेटाने अभ्यास करून या पदाला गवसणी घातली .राहुलच्या या यशाने त्याचे शेतमजुरी करणारे कुटुंब उजळून निघाले आहे.