MPSC PSI Success Story : आपण लहानपणापासून ध्येय निश्चित केले तर यशाची पायरी गाठता येते. तसेच महेशला लहानपणापासूनच अधिकारी व्हायचं आहे, हे मनाशी ठाम बांधून पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यासास सुरुवात केली. आपली नोकरी सांभाळत मिळेल त्यावेळेस ग्रंथालयामध्ये अभ्यास करून हे उत्तुंग यश मिळवले. महेश शामराव थोरवे यांनी उज्वल यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवले.
महेश यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाईमध्ये पूर्ण केले. तर उच्च माध्यमिक शिक्षण वाय.सी कॉलेज , सातारा येथे पूर्ण केले.महेश अकरावीला असताना पितृछत्र हरपले. मात्र या अडचणीच्या काळात त्यांच्या आई प्राथमिक शिक्षिका व जिल्हा परिषद शाळा एकसर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती शामराव थोरवे व त्यांचे संपूर्ण कुटुंब भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर इंजिनिअर शिक्षण पूर्ण केले.या संपूर्ण प्रवासात अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये संधी काही गुणांसाठी हुकवत होती मात्र निराश न होता त्याचे प्रयत्न सातत्याने चालू होते.
अखेर, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यानंतर अंतिम उमेदवारांच्या नावाची यादी आणि पात्रता गुण (कटऑफ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले. यात त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ या परीक्षे अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत यश मिळवले.अपयश आले तरी न डगमगता जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य व प्रामाणिकपणा याच्या जोरावर महेश यांनी यश संपादन केले आहे.