MPSC PSI Success Story घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची…वडील गवंडी कामगार आहेत. दहा बाय दहाच्या झोपडीवजा घर त्यात आई-वडीलांसह सात जणांचे कुटुंब….अशा परिस्थितीत देखील निलेश बचुटे उच्च शिक्षित झाला. एवढेच नव्हे तर कष्टाचे चीज करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. निलेश हा लहानपणापासूनच हुशार असल्याने आई – वडिलांच्या त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.
त्याच्या वडिलांनी गवंडी काम करत चार पैसे गाठीला बांधून निलेशला चांगलं शिक्षण दिलं. निलेशचे शालेय शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले. बी.कॉम व एम.कॉम रामकृष्ण महाविद्यालयातून झाले. घरात दोन वेळच्या खाण्याची वांदे असे दिवस काढलेल्या निलेशने मोठ्या जिद्दीने पदव्युत्तर शिक्षण तर पूर्ण केलेच; मात्र अनेक छोटी-मोठी कामे करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. कुठेतरी त्याला खाकी वर्दीबद्दल खास आकर्षण होते.
माझ्या आयुष्यात असलेल्या परिस्थितीला सामोरे जात, लग्न कार्यात वेटरची नोकरी करत ध्येयाकडे वाटचाल करत राहिला. निलेश यास निगडी येथील ओझर्डे रॅडिकल इन्संस्टिट्यूट चालक प्रा. भूषण ओझर्डे यांचे मार्गदर्शन देखील लाभले. त्याने या मार्गदर्शनासह दिवसरात्र मेहनत घेतली.काही लोक आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करतात. कुठलीही प्रतिकूल परिस्थिती त्यांना अडवू शकत नाही, हे नीलेशने सिध्द करून दाखविले आहे.त्यामुळेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भोसरी येथील निलेश बचुटे हा उत्तीर्ण झाला आहे त्याची
पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झाली आहे. शिक्षण घेत असताना पाहिलेले स्वप्न व आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज आज अखेरीस पूर्ण झाले आहे.