परळी- अंबाजोगाई महामार्गाच्या बाजूला डोंगरदऱ्यामध्ये वसलेले अंबलवाडी या गावातील ऊसतोड कामगार रंभाजी गर्जे व अनुसया गर्जे यांचा मुलगा नितीन. साखर कारखान्यासाठी ऊसतोडणी व शेतमजुरी करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यातूनच मुलाला घडवले आणि शिक्षणासाठी पाठिंबा दिला. नितीनचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नंदागौळ या ठिकाणी शिक्षण पूर्ण केले त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण पाटोदा येथे पूर्ण केले.
पदवी शिक्षणानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे ठरवले. दररोज वाचन व मैदानी सराव केला. यातूनच त्याने २०२२ मध्ये पीएसआयची परिक्षा दिली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या २०२२ च्या पीएसआय परीक्षेमध्ये १०३ रँक ने यश संपादन केले.अथक परिश्रमाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत नितीन याची निवड झाली असून तो प्रशिक्षणासाठी नाशिक येथे रवाना झाला.