शेतकरी कुटुंबातील लेकीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
MPSC PSI Success Story : दुर्गम भागातील जडणघडण आणि ग्रामीण जीवन हे कित्येकदा शिक्षणासाठी अडथळा निर्माण करणारे असते. परंतू आदिवासी समाजात राहूनही मोहोळ तालुक्यातील ढोक- बाबुळगाव येथील पूजा प्रकाश चव्हाण ह्या शेतकरी कुटुंबातील लेकीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
घरी जेमतेम दहा एकर शेती मात्र प्रकाश चव्हाण यांना शिक्षणाचे महत्त्व समजल्याने त्यांनी घरातील इतर कामे बाजूला ठेवून मुलांना शिक्षणाचे बाळकडू दिले.पूजाचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर उच्च शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
आदिवासी समाज अत्यंत गरीब आहे. त्यांच्याकडे फारसे कुणाचे लक्ष नाही. ह्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तिने स्वतःपासून मेहनत घ्यायला सुरुवात केली. तिने त्या दृष्टीने अभ्यास देखील केला. दररोज नित्यनेमाने वाचन व लेखन यामुळे तिची स्पर्धा परीक्षेची तयारी अधिक चांगली झाली. याच मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा का आयोगातर्फे सन 2020 साली घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदी जरी निवड झाली असली तरी पुढे परीक्षा देत ‘क्लासवन’ होण्याचा तिचा मानस आहे.