खडतर परिश्रमाचे चीज झाले; सूरज पाडळे बनला पोलिस उपनिरीक्षक
MPSC PSI Success Story : आपल्याला जर एखादे ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी अहोरात्र मेहनत करायची तयारी हवी. हिचं तयारी सूरज पाडळे याने दाखवली.लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत झेप घेतली आहे.
सूरज लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होता. मात्र लहानपणीच आई – वडिलांचे छायाछत्र हरपले. आजीने सांभाळ केला.सूरजचे प्राथमिक शिक्षण रामवाडी, वालूथ, येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण हुमगाव येथे झाले. महाविद्यालय बी.एस.सी पर्यंतचे शिक्षण किसन विर महाविद्यालय वाई येथे घेतले. पुढील एम. एस.सी पुणे विद्यापीठातून केली आहे. घरची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती नसल्याने त्याने नोकरी करत शिक्षण घेतले. पण पुढे सूरजच्या लहान भावाने मोठ्या भावाची भूमिका निभावत खाजगी नोकरी पत्कारून घराची जबाबदारी अंगावर घेतल्याने सूरजचा अभ्यासाचा मार्ग मोकळा झाला. त्याने आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित केले.
आता त्याने स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला होता.अनेकदा त्याला यशाने हुलकावणी दिली मात्र सूरजने जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. त्याने कठोर परिश्रम चालूच ठेवले होते. सूरजने सन २०२२ मध्ये पी. एस आय. पदाकरीता लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा दिली होती. या स्पर्धा परीक्षांचा निकाल नुकताच लागला असून सूरजच्या खडतर परिश्रमाचे चीज झाले. त्याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.