MPSC Rajyaseva Pre 2020 – The Latest Scenario
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींना,
सस्नेह नमस्कार! स्पर्धा परीक्षा देणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनी, सध्या तुम्ही सर्वजण कोणत्या मानसिक अडचणींना तोंड देत आहात याची मला पुरेपूर जाणीव आहे, म्हणूनच आज आपल्याशी संवाद साधत आहे.
मित्रहो आपला देश एका मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे कोविड – 19 या विषाणूमुळे फक्त भारतीय नागरिकच नव्हे तर संपूर्ण मानव जात संकटात सापडलेली आहे. या विषाणूने कधी नव्हे थांबलेली भारतीय रेल्वे असो, विमानांची उड्डाणे असो की महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी असो सर्वच थांबलेले आहे. तुम्ही सर्वजण या प्रक्रियेचा एक हिस्सा आहात. सर्वांचेच नियोजन कोलमडले आहे. 5 एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा परीक्षेसाठी गेल्या वर्ष दोन वर्षापासून तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करीत होतात, ती परीक्षा आता 26 एप्रिल रोजी होणार असे तात्पुरता तरी आयोगाने निश्चित केले आहे, यात बदल होऊ शकतो. तसेच 3 मे रोजी होणारी पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, मंत्रालय सहाय्यक या पदांची पूर्वपरीक्षा 10 मे रोजी होणार आहे. आधीच वर्षभरापासून या परीक्षांची तुम्ही वाट बघत होतात आणि त्या परीक्षाही आता पुढे ढकलल्या गेल्या. पुन्हा कोरोना मुळे तुम्हाला अभ्यासाच्या ठिकाणाहून गावी जावे लागले. अशी सगळी गोंधळाची परिस्थिती समोर असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी गोंधळलेल्या मानसिकतेत आहेत.
मित्रहो सर्वात आधी जे आपल्या हातात नाही त्याबद्दल उगाच चिंता करून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवू नका. ज्या आजारामुळे मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्था डबघाईला गेल्यात, करोडो रुपयांची संपत्ती असतानाही कुटुंबीयांना न भेटता प्राण सोडावे लागले, ज्यांचे लग्नसोहळे निश्चित झालेले होते त्यांना लग्नाच्या तारखेत बदल करावे लागलात. मोठमोठ्या कंपन्या आज कुलूप लावून बंद आहेत. भारतीय इतिहासात कधीही न थांबणारी मुंबईची लोकल व्यवस्था पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. अशा मोठमोठ्या बदलांपुढे आपली एक नियमित परीक्षा बदलली त्यात इतका मानसिक त्रास करून घेण्याची गरज काय?
या सर्व परिस्थितीतून आपला देश लवकरच बाहेर पडेल. देशहिता पुढे वैयक्तिक शेताचे मूल्य नेहमी नगण्य असते. आपला देश, सरकारी व्यवस्था आणि सर्व सुजाण नागरिक यातून बाहेर पडतील यात शंका नाही.
आता विचार करूया की स्पर्धा परीक्षा विद्यार्थी म्हणून या परिस्थितीत आपण काय करू शकतो. मित्रांनो बघा गेल्या महिनाभरापासून या संकटात सर्वात जास्त जबाबदारी ही प्रशासकीय यंत्रणेवर आहे. तुम्ही सर्वजण याच यंत्रणेचा एक अविभाज्य घटक म्हणजेच अधिकारी होण्यासाठी अभ्यास करत आहात . म्हणजे तुम्ही या देशाचे भावी सैनिकच आहात नाही का? म्हणून न डगमगता न घाबरता एका ध्येयाने मार्गक्रमण करा.
- MPSC Rajyaseva Pre 2020 परीक्षा साठी आता 26 एप्रिल पर्यंत आपल्याकडे 33 दिवस आहेत त्याचे बारकाईने नियोजन करा. असे समजा हा बोनस वेळ मिळालेला आहे.
- ज्या विषयांचा आपल्याला कमी आत्मविश्वास आहे त्यांच्यावर अधिक भर द्या.
- गेले महिनाभर तुम्ही सोडवत असलेल्या सराव प्रश्नपत्रिकांचे योग्य ते विश्लेषण करा आणि ज्या विषयात कमी गुण मिळालेत त्या विषयाचे उपघटक अभ्यासा ..
- MPSC Rajyaseva Pre 2020 – पेपर 2 CSAT हा पूर्णतः सराव आणि आकलन आधारित असल्यामुळे सरावाला महत्त्व द्या.
- आकलन हा मुद्दा समजून घेताना तुम्ही शांत मनाने सामोरे जा, जो विद्यार्थी चिंतेत असतो त्याला आकलन सुद्धा कमी होते, हे माहिती असू द्या.
- तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात काढलेल्या नोट्स तसेच मेमरी मॅप्स यांची उजळणी करा.
- सद्य घटनांचा अभ्यास करताना सध्या सुरू असलेल्या कोरोना ब्रेकिंग न्यूज चा अजिबात अभ्यास करू नका तसेच या ब्रेकिंग न्यूजचा अभ्यासावर देखील परिणाम होऊ देऊ नका
- वार्षिकी, आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प या मुद्द्यांकडे आवर्जून लक्ष असू द्या.
- मित्रहो, देशात आरोग्य आणीबाणी लागलेली आहे .खरंतर संकट गंभीर आहे त्याला खंबीर होऊन तोंड देऊया. बरेचशे भाऊ, बहीण पुणे, औरंगाबाद, जळगाव यासारख्या ठिकाणी अभ्यासासाठी अडकून पडलेले आहेत. पुण्यातील बहुतांश विद्यार्थ्यांची जेवणाची ची फजिती होते आहे. परिवहन कोलमडल्यामुळे तसेच अभ्यासामुळे घरी जाता येत नाही. परीक्षा पुढे ढकलली गेली या सर्व अडचणी खऱ्या आहेत मात्र देशाच्या हितापुढे अतिशय नगण्य आहेत.
जे पुण्यात अडकून आहेत त्यांनी शांत रहा संयम सोडू नका. तुमच्या आयुष्यात यापूर्वी आलेल्या अडचणींवर तुम्ही दृढ व कणखर होऊन मात केलेली आहे. कोणाचीही मदत घ्यायला संकोच करू नका. आजार पसरलेला आहे यातून स्वतःचे संरक्षण करा. तुम्ही शिकलेले आहात म्हणून तुम्हाला जास्त आरोग्य विषयक सल्ला मी देणार नाही मात्र स्वतःचे संरक्षण करा. हे नक्की जीवनात अनेक प्रसंग संकटे वादळे हे आपल्याला खरंतर मजबूत करण्यासाठी येत असतात त्यांचा स्वीकार करा स्वीकार आतूनच आपल्यात संयमाचा जन्म होत असतो. तुमच्या अधिकारी होण्याच्या स्वप्ना बद्दलची तुमची बांधीलकी, समर्पिता, शिस्त, संयम आणि ध्येया बद्दलचे आंतरिक प्रेम महत्त्वाचे आहे.
मित्रहो यशस्वी होणे किंवा अपयशी ठरणे हे कधीच अपघात नसतात. तुम्ही जे आहात जसे आहात ते केवळ तुमच्या स्वतःच्या विचारांमुळे आणि वागणुकीमुळे आहात. तुमचा भविष्यकाळ उजळून निघावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतः मध्ये बदल घडवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला मर्यादा घालणारा घटक आपल्याला ओळखता आला पाहिजे. जेणेकरून त्यावर आपण मात करू शकू.
स्वतःमध्ये उच्च कोटीची प्रेरणा भरून घ्या. मित्रहो प्रखर कष्ट तुम्हाला करावेच लागतील त्याशिवाय पर्याय नाही. सध्या वेळेचे योग्य नियोजन करीत, योग्य कृती करीत रहा. कोणतेही महासंकट आलं तरी सदभाव सोडू नका. माणुसकी जिवंत ठेवा.
अभ्यास करताना चुका करू नका. लक्षात घ्या चूक नावाची अशी कुठलीच गोष्ट नसते . तुमच्या अनावधानाने मुळे, गाफीलपणातून आणि निरर्थक स्वप्नांच्या दुनियेत रममान होण्याच्या वृत्तीतून आपल्यासमोर समस्या निर्माण होत असतात. माणसाचे वैभव संपत्तीत नसून गुणसंपदेतअसते .तसेच ज्ञानपूर्ण व्यक्ती समाजाला नेहमी आदरणीय वाटत असतो. तुम्ही गेले अनेक महिने स्पर्धा परीक्षांमधून अभ्यास करून ज्ञानी झालेले आहात तुम्हाला समाज नेहमी सन्मान देईल याची मला खात्री आहे. सतत पुढे जाण्याचा आणि शिकण्याचा ध्यास कायम ठेवा. तुम्ही प्रत्येक जण अनन्यसाधारण अशी व्यक्ती आहात, तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. म्हणून मित्रांनो अजिबात मरगळ नको. खुल्या दिलाने या परिस्थितीत स्वतःच्या आयुष्याला सामोरे जा. तुमचा मित्र व शिक्षक म्हणून मी तुमचे यश चिंतितो काहीही अडचण असल्यास कृपया संपर्क साधा.
तुमचा मित्र,
जयदीप पाटील
लेखक – दीपस्तंभ संपूर्ण विज्ञान
मोबाईल : 99220041 93