तुम्हीही MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एमपीएससी राज्यसेवा परीक्षे’चा सुधारित अभ्यासक्रम नुकताच जाहीर केला आहे. एमपीएससीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एमपीएससी राज्यसेवा २०२३ अभ्यासक्रम पीडीएफ जारी केली आहे. राज्यसेवेच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या संपूर्ण परीक्षा पद्धतीत २०२३च्या परीक्षा चक्रातून बदल केला आहे. आता (21 जुलै 2022) एमपीएससीने आगामी राज्यसेवा परीक्षेचा अधिकृत सुधारित अभ्यासक्रमही जाहीर केला. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्य सेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा अभ्यासक्रमातील ज्या विषयांकरिता ‘इंग्रजी व मराठी माध्यम निश्चित करण्यात आले आहे, त्या विषयांचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम प्रसिध्द करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने सदर विषयांचा मराठी भाषेतील अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तथापि, सदर सर्व विषयांचा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम व अधिकृत समजण्यात येईल.