⁠
Inspirational

अतिदुर्गम भागातील तरुणाची विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी ; वाचा त्याच्या यशाची ही कहाणी…

MPSC Success Story : तळागाळातील मागास आणि दुर्गम भागातील तरूणाने मिळवलेले यश हे विशेष कौतुकास्पद असते. त्याचे हे फक्त यश नसून तो यातून तरूण व नवी पिढी घडवत असतो. त्यामुळे त्यात एक इतिहास घडवण्याची अनोखी ताकद दिसून येते. हेच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील तळपेवाडी येथील सागरने करून दाखवले आहे.सागर यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि आता सागर एसटीआय झाला. यासाठी सागरने गेली अनेक वर्ष मेहनत घेतली आहे. वाचा त्याच्या यशाची ही कहाणी…

सागर मूळात अत्यंत दुर्गम भागातील असल्याने तिकडे कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या. शिक्षण काय असते, पुस्तकांची दुनिया या सगळ्याचा जराही लवलेशही नव्हता. त्यामुळे सागर गावात शिक्षणाची चांगली सोय नसल्याने मोठ्या बहिणी व दाजीच्या घरी शिक्षणासाठी उंब्रज, ता जुन्नर् जि. पुणे येथे गेला.

सागरचे दाजी तेथील जि.प.प्रा.शाळेत शिक्षक आहेत. त्यामुळे त्याचे प्राथमिक शिक्षण त्याठिकाणी झाले. पुढे अथक प्रयत्नांती जवाहर नवोदय विद्यालय,पुणे या सीबीएससी बोर्ड असलेल्या विद्यालयात जुन्नर तालुक्यातुन सागरची निवड झाली. त्याचे त्याठिकाणी सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. दहावीला ८७% व बारावीला ७३% ने उत्तीर्ण होऊन त्याने फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे, बीएससी – फिजिक्स या विषयात प्रथम श्रेणीने पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केला.

त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला. या प्रवासात तळपेवाडी गावात छोटे दुकान सांभाळून व शेती करून अथक परिश्रम करत सागरच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आईवडिलांनी केला. सागरने देखील प्रामाणिकपणे सरकारी परीक्षांचा अभ्यास केला. त्याने स्वप्न सत्यात उतरवले आणि एमपीएससी अंतर्गत येणाऱ्या ग्रुप ब मधील एसटीआय म्हणजेच विक्रीकर निरीक्षक या पदाला गवसणी घातली.

हा गावाचा अभिमान तरूणांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच आदर्शवादी ठरेल, ही आशा आहे.

Related Articles

Back to top button