MPSC Success Story : अनेक ग्रामीण भागातील तरुण आर्थिक परिस्थिती खडतर आणि बेताची असल्यामुळे स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी पुढे येत नाही. पण दुसरीकडे बराच तरूणवर्ग योग्य दिशेने प्रचंड प्रमाणात अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना गवसणी घालत आहेत. अशाच गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. आरती जालिंदर दहीतुले असं अधिकारी बनलेल्या मुलीचं नाव आहे.
अथक मेहनत, मनात प्रचंड जिद्द आणि अभ्यासातील सातत्य ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये कर सहाय्यक अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.पाचवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम या ठिकाणाच्या सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणाकरिता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पॉलिटेक्निक डिप्लोमा, डिग्री कम्प्लीट केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनायचे निश्चित केले व त्या अनुषंगाने तयारी सुरू केली.
अभ्यासाच्या बळावर एमपीएससीची प्रिलिम्स अर्थात पूर्व आणि मेन एक्झाम म्हणजेच मुख्य परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत मंत्रालयामध्ये कर सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे.