आजोबांचा घेतला आदर्श; अभिषेकने पटकावला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत प्रथम क्रमांक….
MPSC Success Story : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या अभिषेकने घवघवीत यश संपादन केलंय. अभिषेक सालेकर याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अभिषेकचे आजोबा सरकारी अधिकारी होते. त्यांना पाहून लहानपणापासून अभिषेक म्हणायचे की आपण देखील त्यांच्यासारखं सरकारी अधिकारी व्हायचं. अधिकारी होवून जनसेवा करावी, अशी इच्छा अभिषेकची होती. आजोबा मुकुंद हे बीएआरसीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. त्याच दृष्टिकोनातून त्याने मेहनत देखील घेतली.
कल्याण पश्चिम वालधुनी परिसरात भास्कर सालेकर आणि त्यांची पत्नी श्रद्धा सालेकर हे मुलगा अभिषेक सोबत राहतात. भास्कर व श्रद्धा हे दोघंही शिक्षक. भास्कर बीएमसी शाळेमध्ये शिक्षक. तर श्रद्धा या खाजगी शाळेत शिक्षिका. त्यांचा मुलगा अभिषेक हा पहिल्यापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार. अभिषेकने दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर अभिषेकने मागे वळून पाहिलेच नाही नंतर त्याने
मॅकेनिकल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण केलं.
पुढे तो एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागला. त्याने मार्च २०२० मध्ये पहिली स्पर्धा परीक्षा दिली पण कोरोनामुळे निकाल लांबला पण त्याने सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत यश मिळवले. मूळातच आई वडील दोन्ही शिक्षक असल्याने घरातूनच शिक्षणाचं बाळकडू मिळाले हे त्याच्या यशाचे गमक आहे.