MPSC Success Story : पतीच्या पाठिंब्यामुळे अनिता बनली पोलिस अधिकारी!
अनिताच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे लवकर लग्न झाले. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. संसाराचा गाडा ओढत जात असताना स्वप्न पूर्ण होतील की नाही? ही आशा लागून राहिली. पण तिच्या पतीने व सासरच्या मंडळींनी अनिताला खूप पाठिंबा दिला. यामुळेच अनिता सरकारी अधिकारी बनू शकली.
अनिता ही मूळची मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील वाळेण गावची आहे. तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कोळवण या शाळेत झाले. पिरंगुटला तिने बारावीचे शिक्षण घेतले. अनिताचे लग्न कोंढावळे येथील अशोक हुलावळे यांच्याशी झाल्यानंतर दीड वर्षात त्यांना मुलगा झाला.घरकाम संभाळून अनिताने मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने पदवी पूर्ण केली. दरम्यान, पती अशोक हुलावळे ह्यांना त्यांच्या बायकोला सरकारी अधिकारी झालेले पाहायचे होते.त्यामुळे अनितानेही त्यांच्या त्या निर्णयाचा स्वीकार करून २०२० मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तयारी केली.
तिने अशोक हुलावळे यांच्या मार्गदर्शनातून पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व व मुख्य परीक्षा पास केली. अनिताच्या डाएटपासून ते शारीरिक कसरतीपर्यंत अशोक हुलावळे यांनी पूर्णपणे तयारी करून घेतली.
प्राथमिक तयारी व्यवस्थित झाल्यामुळे अनिताने ४ जुलै २०२३ रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि अनिता हुलावळे मुलींमध्ये राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिच्यातील शिक्षणाच्या जिद्दीची जाण झाली होती. तिची बौदधिक क्षमता यामुळे तिला हे यश संपादन झाले आहे.