अधिकारी होण्यासाठी कबाड कष्ट करावं लागत हे तर सांगण्याची गरजच नाही. सध्या स्पर्धा खूपच वाढली आहे. अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारे हजारो-लाखो विद्यार्थी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फ़त (MPSC) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी करीत असतात. MPSC मार्फत दरवर्षी हजारो पदांसाठी भरती केली जाते. यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा. मात्र स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम ही त्रिसूत्री आवश्यक मानली जाते.
दरम्यान, एसटी महामंडळाचे बस चालकाच्या मुलीने जिद्दीच्या जोरावर MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील नगरदेवळ्याच्या अर्चना संदीप राजपूत हिने यश संपादन करत मुलींमध्ये 51वा क्रमांक पटकावले. तिची नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती होणार आहे.
अर्चनाचे दहावीपर्यंतचे शिक्षण सरदार एस. के. पवार विद्यालयात झाले. येथे असताना वादविवाद वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत यश संपादन केले होते. आठवीत असतानाच मी राजपत्रित अधिकारी होणार असे स्वप्न बघितले होते. ते सार्थ करण्यासाठी तेव्हापासून तयारीला लागली होती.
दहावीत चांगले गुण मिळविल्यानंतर अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात रसायनशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिची स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होती. दरम्यान, २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेस बसून पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पाचोरा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले संदीप पद्मसिंग राजपूत यांना दोन मुली असून, मोठी मुलगी वीज वितरण कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. लहान अर्चना हिने अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटत होते.
परंतु तिला स्पर्धा परीक्षांची आवड असल्याने व तिच्या मनातील असलेली जिद्द व चिकाटी लक्षात घेऊन तिला प्रोत्साहित करण्यासाठी तिच्या आई, वडिलांनी सर्वतोपरी सहकार्य केले. आई, वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत अर्चनाने जे यश संपादन केले ते इतर तरुणाईला प्रेरणादायी ठरेल.
या बाबत अर्चनाने सांगितले, की मी जरी ग्रामीण भागातील असली तरी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास, अभ्यासात असलेले सातत्य, आई वडीलांसह आप्तेष्ट व गुरुजनांकडून मिळालेली प्रेरणा माझ्या यशाचे गमक आहे.