कष्टाला पर्याय नाही ; अमळनेरच्या अर्चनाची MPSC मार्फत मुख्याधिकारी पदी निवड!
MPSC Success Story सामान्य कुटुंबातील असल्याने अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील महागडं शिक्षण परवडणार नव्हतं. त्यामुळेच पदवीचे शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचं ठरवलं होतं. तसे तिचे मनापासून इच्छा स्वप्न देखील होते. तिने अमळनेर प्रताप महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या परीक्षेत उल्लेखनीय असे यश संपादन केले. सध्या तिची नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे.
अर्चना संदीप राजपूत ही नगरदेवळा येथील मूळ रहिवासी आहे. तिचे वडील एस.टी महामंडळात वाहक पदावर आहे. अर्चनाचे शालेय शिक्षण नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार हायस्कूल येथे पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंमळनेर प्रताप महाविद्यालयात पदवी शिक्षण घेतले. येथे केमिस्ट्री विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राज्यशास्त्र विषयात एम. ए. (पदव्युत्तर)चे शिक्षण देखील अंमळनेर प्रताप महाविद्यालयातूनच पूर्ण केले. याच दरम्यान तिने पुण्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी देखील सुरू केली.अत्यंत जिद्द आणि कठोर मेहनतीतुन हे यश संपादन केले. इतकेच नाही तर तिची संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमधून ५१ व्या क्रमांकावर निवड झाली आहे.
याशिवाय तिला वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यांची देखील आवड आहे. त्यात देखील तिने विशेष पारितोषिक मिळवले आहेत.