जसे घरातील वातावरण असते त्यानुसार मुलांची जडणघडण होत असते. असेच गडचिरोली जिल्ह्यातील सख्ख्या बहीण भावाने एकाच वेळी पशुधन विकास अधिकारी होण्याचा बहुमान मिळाला आहे. डॉ. निशिगंधा नैताम आणि डॉ.शुभम नैताम असे त्या बहीण भावाचे नाव असून ते आरमोरी येथील रहिवासी आहेत.
डॉ.निशिगंधा नैताम हिचे प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, आरमोरी येथे झाले. तर अकरावी व बारावीचे शिक्षण महात्मा गांधी कनिष्ठ विद्यालय,आरमोरी येथे झाले. नंतर त्यांनी ग्रॅज्युएशनसाठी नागपूर गाठले व वेटेरीनरी कॉलेज,नागपूर येथे पूर्ण केले. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी येथून पूर्ण केले.
डॉ. शुभम नैताम यांचा १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण लिटल फ्लॉवर कॉन्व्हेन्ट,आरमोरी आणि ५ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण हितकरणी हायस्कूल,आरमोरी येथेच झालं. अकरावी आणि बारावीचे शिक्षण त्यांनी लालबहादूर शास्त्री कनिष्ठ विद्यालय,भंडारा येथे पूर्ण केला. तर,नागपूर वेटेरीनरी कॉलेज नागपूर येथे त्यांनी ग्रॅज्युएशन केले.पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण त्यांनी उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय गो अनुसंधान विद्यालय, दुवासू येथे पूर्ण केले.
यांचे वडील देविदास सीताराम नैताम हे जवाहरलाल नेहरू महाविद्यालय,जोगीसाखरा येथे लिपिक या पदावर काम करतात. डॉ.निशिगंधा नैताम यांनी खासगी कंपनीत नौकरी करताना तर शुभम नैताम यांनी शिक्षण घेताना एमपीएससी परीक्षा पास केली आहे.
निशिगंधा यांनी त्यानंतर २०२०-२१ या कालावधीत त्यांनी वेटेरीनरी ऑफिसर म्हणून गुजरात राज्यात काम केले. २०२१ पासून ते आतापर्यंत त्या कर्नाटक राज्यातील बिदर वेटेरीनरी कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. नोकरी करत असताना एमपीएससीची तयारी सुरू होती. बहिणीचा आदर्श घेत शुभम यांनी सुध्दा शिक्षण चालू असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
या दोघांनी २२ डिसेंबर २०२२ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली.५ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत झाली आणि त्याचा निकाल आताच २० ऑक्टोबर २०२३ रोजी लागला. या निकालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी या पदासाठी दोन्ही बहीणभावाची निवड झाली आहे.एकाच घरातील सख्ख्या बहीण भावंडांनी यात घवघवीत यश मिळाल्याने सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.