जळगावच्या तरुणाचा MPSC परीक्षेत डंका ! पहिल्याच प्रयत्नात झाला न्यायाधीश
कुठलीही गोष्ट अवघड नाही, जर आवड आणि आत्मविश्वास असेल तर ती सहज मिळविता येते. याचाच प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून आला आहे. सर्वसाधारण कुटुंबातील वायरमनचा मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजेच MPSC परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. यात वायरमनच्या वकील मुलाने पहिल्याच प्रयत्नात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) पदाच्या परिक्षेत यश मिळवले आहे. हितेश शांताराम सोनार (वय २९ वर्ष) असं वकील तरुणाचे नाव आहे.
हितेश सोनार हे भुसावळचे रहिवासी असून त्यांचे वडील शांताराम सोनार हे वायरमन म्हणून निवृत्त झाले आहेत. तर आई सरोज या गृहिणी आहेत. सोनार यांच्या कुटुंबामध्ये गेल्या १० पिढ्यातही कुणी वकील किंवा न्यायाधीश नाही. स्वत: दहावी पास मात्र आपल्या मुलांनी उच्चशिक्षित व्हावं, मोठ्या पदावर नोकरी करावी, असं स्वप्न शांताराम सोनार उराशी बाळगून होते.
यात शांताराम सोनार हे कुठेही कमी पडले नाही. दोन्ही मुली व मुलगा हितेश सोनार या तिघांना त्यांनी ग्रॅज्युएट केलं. कधी खंब्यावर चढून तर कधी तारा ओढून, ऊन असो की पाऊस, रात्रंदिवस बापाने केलेल्या कष्टाची मुलांना देखील जाणीव होती. हितेश सोनार हे सर्वात लहान व एकुलते आहेत. त्यामुळे हितेश सोनार यांनीही त्यांच्या पध्दतीने वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. ॲड. हितेश सोनार यांचे पूर्ण शिक्षण भुसावळ येथेच झाले. २०१३ मध्ये त्यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली. त्यानंतर २०१७ मध्ये एलएलबीची पदवी घेतली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ते एलएलबी विषयात सुवर्ण पदक विजते आहेत. त्यानंतर त्यांनी पुण्यात प्रॅक्टिस सुरू केली.
आपल्या मुलानं सरकारी नोकरी करावी, असं शांताराम सोनार यांची खूप इच्छा होती. त्यानुसार हितेश सोनार यांना देखील ‘ऑर्डनन्स फॅक्टरी’त नोकरी लागली. केंद्र सरकारचा अंतर्गत ही फॅक्टरी होती. चांगल्या पगाराचीही नोकरी होती. मात्र, ही नोकरी त्यांनी सोडली. त्यावेळी कुटुंबीय चिंताग्रस्त होते. “चुकीच्या दिशेने जाऊन नुकसान होईल”, असे वडीलांचे म्हणणे होते. त्यामुळे नोकरी सोडण्यास त्यांचा नकार होता.
मात्र, हितेश सोनार त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी त्यांचे कुटुंबीय ठामपणे उभे राहिले. त्या काळात वर्ष ते दीड वर्ष हितेश सोनार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचाही अभ्यास केला. याचदरम्यान संविधान हा त्यांचा आवडीचा विषय होता. न्यायव्यवस्थेत काम करायला मिळायला पाहिजे. त्याबरोबरच सामाजिक कार्य करता आलं पाहिजे, अशी हितेश सोनार यांची इच्छा होती. या आवडीनुसार अभ्यास करत हितेश सोनार यांनी २०१७ मध्ये पहिल्या क्रमाकांने उत्तीर्ण होत तसेच सुवर्ण पदक प्राप्त करत विधीशाखेची पदवी घेतली आणि आपले इरादे स्पष्ट केले. संकट अडचणींवर मात करत हितेश सोनार यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदासाठी परिक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते उत्तीर्ण देखील झाले.