MPSC Success Story आदिवासी भागातील मुलांमध्ये प्रचंड मेहनत करण्याची क्षमता असते. परंतू, योग्य मार्गदर्शन नसल्याने त्यांच्या क्षमतांना हवा तेवढा वाव मिळत नाही. त्यामुळे ते देखील स्पर्धा परीक्षेसारख्या गोष्टींकडे लगेच वळत नाहीत. पण पल्लवीने मेहनतीच्या जोरावर एमपीएससी परीक्षेत यश मिळवून दाखवले. पल्लवी नामदेव बांडे हिची एकाच वेळी सहायक कक्ष अधिकारी (ASO) वर्ग २ आणि राज्य विक्रीकर निरीक्षक (STI) वर्ग २ या परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन्ही पदांवर निवड झाली आहे.
अकोले तालुक्यातील कोंदणी या गावी पल्लवीचा जन्म झाला. वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण हे खडकी व सावरकुटे याठिकाणी झाले तर माध्यमिक शिक्षण हे मधुकरराव पिचड माध्यमिक विद्यालय राजूर या शाळेत झाले. उच्च शिक्षण हे राजूरमधेच सर्वोदय विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेज याठिकाणी झाले. तर पुढील शिक्षणासाठी पल्लवी नाशिक या ठिकाणी बी.एस.सी. ॲग्री-के. के. वाघ कॉलेज नाशिक, एम.एस.सी.ॲग्री-राहुरी कृषी विद्यापीठ या ठिकाणी पदवी शिक्षण घेतले. हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
लहानपणापासून पल्लवीला वाचनाची आवड होती. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना विविध पुस्तकांचे वाचन देखील केले. वाचनातील गती आणि सातत्य यामुळे तिला हे यश मिळाले आहे. पण हा प्रवास नक्कीच सोप्पा नव्हता. २०२१ मध्ये पल्लवी MPSC (फॉरेस्ट डिपार्टमेंट) च्या RFO पदासाठी मुलाखतीपर्यत गेली. परंतू काही मार्क्सने पोस्ट गेली. याक्षणी ती खूप नाराज झाली पण घरच्यांनी तिला बराच पाठिंबा दिला. तिने पुन्हा नव्याने अभ्यासाला सुरुवात केली. यामुळेच, तिने एकाच नव्हे तर दोन परीक्षांत यश मिळवले आहे. भविष्यात तिला देखील आदिवासी मुलांसाठी काम करायचे आहे.