MPSC Success Story : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना Does & Doesn’t या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. आपण या काळात कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या नाही, या सूत्रांच्या आधारे अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. असाच प्रवास पूनम अहिरे हिचा आहे.
पूनमचे आई – वडील हे दोघेही शिक्षक असल्याने लहानपणापासून शैक्षणिकदृष्ट्या संस्कार झाले. यांच्या मार्गदर्शनात सुरवातीपासूनच अभ्यासाची आवड निर्माण झाली. त्यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले.वाचनाची आवड, विविध उपक्रमात सहभाग आणि सातत्याने लेखन व भाषणे ऐकून पूनमला आपणही अधिकारी व्हावे हे लक्षात आले. बागलाण तालुक्यातील केरसाणे या लहानशा गावची पूनम उपजिल्हाधिकारी झाली.
तिचे आई-वडील दोघेही बलायदुरी ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. तिने गाव व तालुक्याला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेची तयारी पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी, पुणे विद्यापिठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात केली.
या काळात बऱ्याच पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा नेमकी आणि सरावाची पुस्तके वाचली असल्याने पेपर सोडवण्यासाठी मदत झाली. पूनमने यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परीक्षेत अधिकारी वर्ग २ परिक्षेत यश मिळवले. मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून सेवेत रुजू झाली होती. मात्र, तिला याहून उच्च पद मिळवण्याचा ध्यास होता. अभ्यासातील सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने पुन्हा परीक्षा दिली आणि उपजिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचली.हा प्रवास फक्त ध्यासाचा नसून सातत्याने अभ्यास करण्याचा आहे.