MPSC Success Story कोणतेही परीक्षा असली की मेहनतीशिवाय पर्याय नाही. तसेच बीडच्या शुभम प्रताप पाचंग्रीकर या तरूणाने एमपीएससी परीक्षेसाठी अनेक वर्षे मेहनत घेतली. गेल्या चार वर्षांपासून तो सतत अभ्यास करत होता. सरकारी नोकरी किंवा सरकारी अधिकारी व्हावे, अशी इच्छा अनेक तरुणांची असते. तशीच शुभमची देखील होती त्यासाठी त्याने तसा नियोजनबद्ध अभ्यास केला.अखेर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२०च्या राज्य कर निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केलं आहे. या तरुणानं फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात कर निरीक्षक म्हणून पहिला क्रमांक पटकवला आहे.
शुभमचे वडील प्रतापराव हे शासकीय निवृत्त कर्मचारी आहेत. वडीलांची शुभमने शासकीय नोकरदार व्हावे,अशी इच्छा होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी शुभमला मार्गदर्शन केले. शुभमचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे बीड येथील चंपावती माध्यमिक विद्यालयात झाले. त्याला दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळाले. सुरुवातीपासूनच शिक्षणात हुशार असलेल्या शुभमने शिक्षणाचा एक एक टप्पा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केला. पुढं उच्चशिक्षणासाठी त्याने पुणे गाठले आणि इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग मध्ये शिक्षण घेतलं. या शिक्षणावर त्यानं एका नामांकित कंपनीमध्ये एक वर्ष नोकरी देखील केली. पुढे सरकारी अधिकारी होण्याच्या उद्देशाने अभ्यास चालू केला.
साधारणपणे शुभमने २०१८ पासून एमपीएसी परिक्षेची तयारी सुरू केली. सतत चार वर्षे तो अभ्यास करत होता. त्याने मेहनतीने आणि चिकाटीने अभ्यास केला. अखेर त्याने एमपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर निकाल लागल्याचे मला मित्रांकडून समजले. निकाल तर लागला पण आपण राज्यात पहिला क्रमांक मिळाला यावर विश्वासच बसत नव्हता.यात शुभमला ३०६ गुण आहेत. या गुणांसह शुभमने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शुभमच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुढे, त्याला इतरही परीक्षा द्यायच्या आहेत.