MPSC Success Story आपल्याला स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल तर यश हे मिळतेच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ग्रामीण भागात राहून देखील प्रशासकीय अधिकारी होणारी सुरेखा कांबळे.
सुरेखा सौदागर कांबळे हिचे मोहोळ तालुक्यातील देवडी हे मूळ गाव. देवडी व देवडी फाटा दरम्यान ‘अभिवंत वस्ती’ आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा आहे. तिचे देवडी गावच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण झाले. पुढे, महाविद्यालयीन शिक्षण सुरुवातीला मोहोळच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये तर नंतर पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली.
गावातील जडणघडण झाली असली तरी तिची जिद्द ही महत्त्वाची होती. लहानपणापासून तिला अधिकारी बनायचे होते. त्या दृष्टीने तिने वाटचाल सुरू केली. वडील अशिक्षित असूनही त्यांनी सुरेखा आणि दुसऱ्या मुलीला शिक्षणात काहीच कमी पडू दिले नाही. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय अधिकारी होण्याचं ध्येय उराशी बाळगले. तिने ग्रामीण भागातील जनतेचे काय हाल असतात हे जवळून पाहिले होते.
त्यामुळे आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे चीज करून सर्वसामान्याला जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी एमपीएससीची तयारी सुरू केली. सुरेखाने पहिली परीक्षा २०२० साली दिली. त्यातही प्रथम क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली व नायब तहसीलदारपदी निवड झाली. तोच आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तिचे नागपूर येथे प्रशिक्षण सुरू होते. यावेळी ते करत करतच २०२१ साली पुन्हा दुसरी परीक्षा दिली. त्यात क्लास वन अधिकारी झाली.ग्रामीण आयुष्यात असणारा संघर्ष आणि वास्तवाची जाण असे अजूनही स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश अनेक मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.