⁠  ⁠

MPSC Success Story : जिद्दीला सलाम, ऊसतोड कामगाराची कन्या बनली PSI

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

मनात स्वप्न असेल तर कोणत्याही परिस्थितीत ते पूर्ण करता येतं, हे स्वाती रामराव डंबाळे करून दाखवलं आहे. पालक ऊसतोड कामगार आणि घरची‎ आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील तिने न खचता आपल्या जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा‎ आयोग (MPSC) ने घेतलेल्या परीक्षेत PSI पदाला गवसणी घातली आहे.

MPSC मार्फत पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या (PSI) पदाच्या ५६० जागांसाठी २०२० साली परीक्षा घेण्यात आली होती. याची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यात स्वाती डंबाळे हिला ‎५४० पैकी एकूण ३४५ गुण मिळाले.‎

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील बांदरवाडा‎ येथील रामराव लक्ष्मणराव डंबाळे हे‎ ऊसतोड कामगार म्हणून काम करतात.‎ त्यांना चार अपत्ये. अतिशय प्रतिकूल‎ परिस्थितीला झगडत त्यांनी दोन मुली‎ आणि दोन मुलांना शिकवले. चौघांनीही‎ परिस्थितीचा बाऊ न करता शिकण्याची‎ जिद्द कायम ठेवली. शिक्षण घेऊन‎ मोठ्या पदावर निवड होण्याचे स्वप्न‎ उराशी बाळगले. डंबाळे यांच्या सर्वात‎ मोठ्या मुलीने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण‎ केले. सध्या पाथरी येथील रुग्णालयात‎ परिचारिका म्हणून कार्यरत आहे. दुसरी‎ मुलगी स्वातीने शिक्षण पूर्ण केले व‎ स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.‎

शहरात जाऊन महागडी शिकवणी‎ लावणे शक्य नसल्याने स्वातीला डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि‎ प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत‎ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी‎ असणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा‎ शिकवणी वर्गाचा एकमेव पर्याय‎ उपलब्ध होता. स्वातीने बार्टीची प्रवेश‎ परीक्षा दिली. तीत चांगले गुण‎ मिळाल्याने तिला छत्रपती संभाजीनगर‎ येथील संस्थेत प्रवेश मिळाला. बार्टीचे‎ केंद्र, संबोधी अकॅडमी येथे पीएसआय‎ पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षाची पूर्ण‎ तयारी करून घेण्यात आली.‎

आईवडिलांची मेहनत, काबाडकष्टांची‎ जाणीव असल्याने व त्यांचे स्वप्न पूर्ण‎ करायचे असल्याने स्वातीने अतिशय‎ जिद्दीने अभ्यास केला. राज्य लोकसेवा‎ आयोगाची पोलिस उपनिरीक्षक पदाची‎ परीक्षा दिली. ४ जुलै रोजी राज्य‎ लोकसेवा आयोगाने निवड यादी जाहीर‎ केली. त्यात स्वातीने यश मिळवले.‎ स्वातीच्या या यशाबद्दल तिचे सर्व‎ स्तरातून अभिनंदन केले जात आहे.‎

कष्टाचे चीज झाल्याची‎ पालकांची भावना‎ स्वातीचे आई-वडिल कामानिमित्त‎ सतत घराबाहेर राहायचे. तिला दोन लहान भाऊ असल्याने‎ ‎ स्वातीला घराची देखभाल‎ करण्यासाठ घरीच थांबावे लागत‎ असे. स्वातीची फौजदारपदी निवड‎ झाल्याचे कळताच कष्टाचे चीज‎ झाल्याची भावना पालकांनी व्यक्त‎ केली. शालेय जीवनापासूनच ती‎ अभ्यासात हुशार असल्याचे तिच्या‎ पालकांनी सांगितले.‎

Share This Article