⁠
Inspirational

गावचा अभिमान : पाचोरा तालुक्यातील विशाल बनला PSI अधिकारी !

MPSC Success Story : खरंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळणे ही सद्यस्थितीत कठीण बाब असली तरी जिद्द असल्यावर हे यश नक्कीच मिळते‌. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या भागातील विशाल गोपाळ पाटील याची पीएसआय पदी निवड झाली आहे.

त्याचे वडील गोपाळ पाटील हे ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. पिंपळगाव येथील ग्रामविकास विद्यालयात विशालचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. तसेच जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात त्याने विज्ञान शाखेत बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेत बीएससी ॲग्री म्हणजेच कृषी क्षेत्रात २०१८ साली पदवी शिक्षण पूर्ण केले.

याच दरम्यान त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी तर केलीच पण शारीरिक मैदानी सरावावर अधिक भर दिला. पदवीनंतर त्याने जेव्हा पहिल्यांदा एमपीएससी दिली तेव्हा तो अपात्र ठरला‌. अपयशाने खचून न जाता २०२१ साली निघालेल्या पीएसआयच्या पदासाठी अर्ज करत पुन्हा एकदा त्याने नव्या उत्साहात परीक्षेसाठी तयारी केली. या दरम्यानचा कोरोना काळ हा सर्वांसाठी भयंकर होता. मात्र, त्यावेळी त्याने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केल्यानेच हे यश मिळाले. कोरोना काळात शासनाच्या जाहिराती देखील प्रसिद्ध होत नव्हत्या. असे असताना त्याने मात्र, स्वतःला धीर देत प्रेरित ठेवले आणि सेल्फ स्टडी सुरू ठेवली आणि आज हे यश मिळवले. त्याला २८९.५ एवढे गुण मिळाले असून त्याची पीएसआय पदी निवड झाली आहे.

Related Articles

Back to top button